खासदारकीच्या टप्प्यातील चौपदरीकरणाबाबत ना.गडकरी यांच्यासोबतच्या चर्चेत…….राष्ट्रीय पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्यासमक्ष महत्वपूर्ण निर्णय-खा.सुनील तटकरे
पोलादपूर,
इंदापूर ते चिपळूणपर्यंत दुसर्या टप्प्यातील खासदारकीच्या क्षेत्रातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध वृत्तपत्रांमधून प्रसिध्द होणार्या अभ्यासपूर्ण बातम्यांच्या संदर्भातून एक सविस्तर निवेदन देेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष खा.शरदश्चंद्र पवार यांच्यासमक्ष केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री ना. नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून येत्या काही दिवसांत दिल्लीमध्ये याबाबत ना.गडकरी यांच्याकडून अधिकृतरित्या घोषणाही होणार आहे. पोलादपूर तालुक्यातील जनतेचा विश्वास अधिकच दृढ करण्यासाठी येत्या काळात महत्वपूर्ण निर्णय जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्यामाध्यमातून घेण्यात येतील, अशी ग्वाही रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशकर्त्यांच्या स्वागत सोहळ्याप्रसंगी दिली.
यावेळी व्यासपिठावर माजी राजिप राष्ट्रवादी प्रतोद सुभाष निकम, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.सी.जाधव, विधानसभा अध्यक्ष खानविलकर, महाड तालुका अध्यक्ष निलेश महाडीक, संतोष देशमुख, माजी राजिप अध्यक्षा अपेक्षा कारेकर, सोमनाथ ओझर्डे, चंद्रकांत जाधवबुवा, महाड अध्यक्ष निलेश महाडीक, ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णादादा करंजे, सुहास मोरे, पोलादपूर शहरअध्यक्ष अजित खेडेकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष महमद मुजावर, राष्ट्रवादी युवती जिल्हा संघटीका प्रतिमा जाधव, अभंग जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी काँग्रेसचे महाळुंगेतील बाळकृष्ण चव्हाण आणि उपसरपंच सुभाष भागूराम साळवी यांच्यासह शेकडो महिला पुरूष कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. तुर्भे बुद्रुकमधील नरेश शेलार व निशा शेलार यांच्यासह गोळे, बांदल, शेठ, शिंदे, उतेकर यांनी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. किनेश्वर शिववाडी येथील निवृत्ती पवार, गोपाळ भिलारे व अन्य ग्रामस्थांनी काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. माटवण बौध्दवाडीतील शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.
याप्रसंगी तालुका युवक राष्ट्रवादी अध्यक्ष प्रमोद शिंदे, तालुका युवक राष्ट्रवादी अध्यक्ष अनिरूध्द भोसले, लोहारे तुर्भे गणाचे अध्यक्ष सहदेव उतेकर, अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष नवाज मोहिद्दिन हुर्जूक, जिल्हा परिषद लोहारे गट अध्यक्ष नरेश शेलार यांना पदनियुक्तीची पत्र खा.सुनील तटकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली.
प्रवेशकर्त्यांच्यावतीने महाळुंगेतील पोलीस पाटील बाळकृष्ण चव्हाण यांनी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या 25-30 वर्षांपासून कार्यरत असताना पालकमंत्री असलेल्या सुनील तटकरे यांच्या संपर्कात विविध कामांसंदर्भात होतो. स्व.माणिकराव जगताप यांचे नेतृत्व आम्ही मानत असलो तरी विकासकामांची गरज पूर्ण होण्यासाठी गेलो आणि कामांना मंजूरी मिळाली तेव्हाच मनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि आज महाळुंगे ग्रामस्थांसोबत प्रवेश केला आहे, असे आवर्जून सांगितले.
प्रारंभी राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.सी.जाधव यांनी, पोलादपूर तालुक्यातील विविध समस्या, उद्योग, स्वयंरोजगार, महिला बचत गट तसेच तरूणांना नोकरी आदी विषयांचा आढावा घेताना नजिकच्या काळामध्ये निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासाठीचे पाठबळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
खा.सुनील तटकरे यांनी याप्रसंगी 22 जुलैच्या काळातील नैसर्गिक आपत्तीनंतर 23 जुलैपासून आमदार अनिकेत तटकरे त्यांच्या मित्रमंडळ तरूण कार्यकर्त्यांसमवेत तर पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी प्रशासनासमवेत महाड पोलादपूर तालुक्यातील आपदग्रस्त जनतेच्या मदतीसाठी दिवसरात्र कार्यरत होते. येथील जनजीवन पूर्वपदावर येण्यासोबतच मदतकार्य अन् मोठ्या प्रमाणात प्राथमिक गरजा भागविण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळेही जनतेच्या सुख-दु:खातील ते सोबती ठरले. आपणही महाड, खेड, चिपळूण भागातील दौरा करून व्यापारी,उद्योजक आणि सर्वसामान्यांच्या समस्यांचा केंद्रसरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी हिरिरीने प्रयत्न केल्याचा आढावा घेतला. राज्यसरकारच्या माध्यमातून महाआघाडीचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निर्णयानुसार जाहिर झालेली मदत लवकरच आपदग्रस्तांना मिळेल. प्रवेशकर्त्यांना केवळ सन्मानानेच नव्हे तर नजिकच्या काळात सक्रीयतेने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी खंबीर बनवू, असे सांगितले.
यानंतर खा.तटकरे यांनी माजी सभापती सुरेश जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटूंबियांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध राजकीय पक्षातील प्रवेश इच्छुकांनी खा.तटकरे यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली.