325 ते 350 जागा जिंकत आम्ही पुन्हा सत्तेत येऊ; योगी आदित्यनाथ यांचा दावा

लखनौ,

आगामी विधनानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजप सहजच जिंकेल, असा विश्वास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. भाजप फक्त जिंकणारच नाही, तर 2017 सालातील 312 जागा जिंकण्याचा रेकॉर्ड तोडत 325 ते 350 जागा जिंकू, असेही आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

योगी यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की आत्तापर्यंतची राज्य सरकारची कामगिरी, आर्थिक विकास, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहूनच पुन्हा एकदा विजय प्राप्त होईल. आदित्यनाथ यांना विश्वास आहे की ते त्यांच्या सरकारच्या कारभाराच्या रेकॉर्डवर लक्ष केंद्रित करून आणि जातीय समीकरणाचा समतोल साधून कोणत्याही सत्ताविरोधावर मात करतील.

मला परत जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. उत्तर प्रदेशची राजकीय गतिशीलता मी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, कारण गेल्या 23 वर्षांपासून मी राज्याच्या सक्रिय राजकारणात आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांची मला राजकीय समज आणि परिपक्वतेबद्दल विश्वास असल्याचेही योगी म्हणाले. आपल्या मंत्रिमंडळाचा त्यांनी 26 सप्टेंबर रोजी विस्तार केला आणि आणखी सात मंत्र्यांसाठी जागा तयार केली. सामाजिक संतुलन राखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आपण आणखी जागा तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर आदित्यनाथ यांनी हे देखील स्पष्ट केले की भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडणार नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!