ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार

उरण, जेएनपीटी, खारेगाव,दापोडा, नेवाळी येथील जागांची

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

ठाणे,

ठाणे जिल्ह्यातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शहराच्या वेशीबाहेर अवजड वाहनांच्या नियमनासाठी पार्किंग प्लाझा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अनुषंगाने जागांची निश्चिती करण्यासाठी आज नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उरण, खारेगाव, दापोडी, उरण, भिवंडी, या भागाचा दौरा करून पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागांची पाहणी केली.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. यावर मार्ग शोधण्यासाठी नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली होती. त्या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहराबाहेर स्वतंत्र पार्किंग लॉट तयार करून तिथे वाहने अडवून ठरलेल्या वेळेप्रमाणे सोडण्याचे निश्चित करण्यात आले होते.

उरण जेएनपीटी मधून निघणारी वाहने मोठ्या प्रमाणात ठाणे मार्गे गुजरात कडे रवाना होत असल्याने सिडकोच्या हद्दीतील मोकळ्या जमिनीचा आढावा घेतला. यावेळी राजदान फाट्याजवळील 100 हेक्टर जागा तसेच अन्य काही जागांची श्री. शिंदे यांनी पाहणी केली. या जागांचे सपाटीकरण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर जेएनपीटीने उभारलेल्या अद्ययावत पार्किंग लॉटची देखील श्री. शिंदे यांनी पाहणी केली. तसेच जेएनपीटीच्या वतीने एक्स्पोर्टसाठी त्यांच्या सीएफएस म्हणजेच सेन्टरलाईज फ्रेट सेन्टर मध्ये जाण्यापासून अडवू नये, अशी विनंती करण्यात आली. मात्र सीएफएस केंद्रातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना वेगवेगळ्या रंगांचे स्टिकर्स लावून त्यांचे सिडको, जेएनपीटी आणि नवी मुंबई आणि रायगड पोलीस यांच्या माध्यमातून नियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या साऱ्या यंत्रणांची एकत्रित टीम तयार करून टप्प्याटप्प्याने ही वाहने रात्री 11 ते 6 या वेळेत सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

ठाणे शहराच्या सुरुवातीला खारेगाव टोलनाक्यालगतच्या  दोन्ही बाजूच्या जमिनीची देखील श्री. शिंदे यांनी पाहणी केली. या जमिनीवर भराव टाकून त्यानंतरच त्या पार्किंग लॉट म्हणून वापरता येणे शक्य असल्याने शक्य तेवढ्या लवकर या जागेचे सपाटीकरण करण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि एमएसआरडीसीला दिले.

मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने त्याठिकाणी सोनाळे आणि दापोडा या दोन गावातील जागांची पाहणी करून या जागा पार्किंग लॉटसाठी उपलब्धता तपासण्यात आली. तसेच मनोर भिवंडी मार्गावरून गुजरात कडून मोठ्या प्रमाणात वाहतूक ठाण्याकडे येत असल्याने भिवंडी ग्रामीण क्षेत्रातील पार्किंगसाठी उपलब्ध होऊ शकतील आशा संभाव्य जगाची पाहणी श्री. शिंदे यांनी केली. येत्या काही दिवसात या जागा तयार झाल्यानंतर अवजड वाहनांच्या पार्कींग लॉट साठी त्या वापरल्या जातील यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन लोकांना दिलासा मिळू शकेल.

            यावेळी ठाणे मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, जेएनपीटीचे सह व्यवस्थापकीय संचालक उन्मेश वाघ, उपजिल्हाधिकारी अमोल यादव, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे,  अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, ठाण्याचे तहसीलदार दिनेश पैठणकर, वाहतूक विभागाचे उपयुक्त विनय राठोड आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!