साहित्य समाजाच्या विकासासाठी साह्यभूत – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

औरंगाबाद, दि. 25

साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचं व दिशा देण्याचे कार्य साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असते. काव्य, नाटक, कथा, कादंबरी या घटकाच्या माध्यमातून समाजाला वैचारिक मेजवाणी मिळत असते. या घटकांना साह्य आणि मदत करण्याचे काम शासन करीत आहे. यातूनच मराठवाडा साहित्य परिषदेचे नांदेड येथील कार्यालय सुरु करण्याची ग्वाही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री  अशोक चव्हाण यांनी दिली. मराठावाडा साहित्य परिषद आणि लोकसंवाद फाऊंडेशन आयोजित 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, आमदार सतिश चव्हाण, मधुकर अण्णा मुळे, के. एस. अतकरे, मावळते संमेलन अध्यक्ष ऋषीकेश कांबळे, साहित्यिक दादा गोरे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, लोकांच्या मनातील संवाद व्यक्त व्हायला पाहिजे, बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कसा करता येइल याबाबतही चिंतन होणे गरजेचे आहे. वाचनातून वैचारिक बैठक तयार होवून समाजाला दिशा दर्शक भावी पिढी घडवण्याचं काम साहित्य करित असते विचार व्यक्त करण्याची मोकळीक साहित्य लेखणातून मिळते म्हणून साहित्याचा उल्लेख सामाजाचे प्रतिबिंब म्हणून केला जातो, असे मत मंत्री अशोक चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले.

या संमेलनाच्या प्रास्ताविकात कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्य आणि मागण्या, संमेलन आयोजनामागची भूमिका व्यक्त केली. तसेच नांदेड येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयाची सुरुवात करण्याबाबत मागणी मांडली.

मावळते अध्यक्ष ऋषीकेश कांबळे यांनी साहित्यात मराठवाड्याचे योगदान, साहित्य चळवळ आणि साहित्यातील बदलते स्वरुप याविषयी मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात बाबु बिरादार यांनी आपली साहित्यिक जडणघडण व जीवनानुभव व्यक्त करणाऱ्या साहित्याची निर्मिती त्या विषयी सांगितले. तसेच मराठवाड्याची संत परंपरा, निसर्ग, अनुभव व संस्कार यामुळे मराठवाड्यातील साहित्यिक जमिनीवर राहून लिखाण करीत आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान देशमुख यांच्या ‘संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची’ या गीताने झाली यांनतर संमेलन उद्घाटन कार्यक्रमात शेवटी ‘गोंदन’ या मराठवाडा साहित्य परिषदेचे स्मरणिकेचे प्रकाशन तसेच बाबू बिरादार यांच्या ‘अधिवास’ या कादंबरीचे प्रकाशन मंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यवर साहित्यिक यांच्या उपस्थितीत केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!