पोलादपूर शहरातील आंतरधर्मीय विवाह पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावरील ‘त्या’ पोस्टबाबत वंचित बहुजन आघाडी आक्रमक
पोलादपूर,
गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान निर्माण झालेल्या प्रेमसंबंधांचे विवाह संबंधांमध्ये रूपांतर झाल्याच्या घटनेला धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सोशल मिडीयावरून एका व्यक्तीने केले. याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून संबंधित व्यक्तीविरूध्द कारवाईची मागणी करीत आंदोलनाचा इशारा देत आक्रमक स्वरूप धारण केले आहे. मात्र, यामुळे दोन भिन्नधर्मियांच्या विवाहप्रसंगी आणखी दोन विचारप्रवाह सक्रीय झालेले दिसून येत आहेत.
पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणार्या बहुजन समाजाच्या कुटूंबातील मुलीचे भिन्नधर्मिय कुटूंबातील मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधाबाबत गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही कुटूंबियांमध्ये समजविण्यासाठी बैठका होऊन सदरचे प्रेमीयुगुल शांत झाले होते. मात्र, अचानक प्रेमी युगुलाने विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही कोणालाही न सांगता घरातून जाऊन विवाहबध्द झाले. यादरम्यान, मुलीच्या कुटूंबियांनी मिसिंग झाल्याची तक्रार नोंदवली आणि मुलगी आल्यानंतर काहीही तक्रार नसल्याचे सांगितले. दोघांनी विवाह केल्याची कागदपत्रे सादर केल्यानंतर ते दोघेही सज्ञान असल्याचे निष्पन्न झाल्याने हा विषय मिटला होता. यामुळे प्रेमीयुगुलाला वैवाहिक जीवन जगण्याची संधी कोणत्याही वादाविना प्राप्त झाली.
याचदरम्यान, मुलीच्या वडीलांच्या दुकानाशेजारील वाद घालून त्रास देणार्या व अलिकडेच गोड झालेल्या एका दुकानदाराने अचानक ही संधी साधून फेसबुकवरील स्वत:च्या अकाऊंटवर झालेले लग्न कायदेशीर सज्ञान व्यक्तींमध्ये झाले असल्याचे माहिती असूनही धार्मिक भिन्नतेचा उल्लेख करून तणाव निर्माण होईल, अशी पोस्ट सोशल मिडीयावरून लिहिली. या पोस्टमुळे या प्रेमीयुगुलाच्या कायदेशीर विवाहाकडे चुकीच्या पध्दतीने लक्ष वेधले गेले.
‘त्या’ पोस्टमुळे वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक लक्ष्मण दगडू पवार यांनी, सदरच्या पोस्टद्वारे सदर व्यक्तीने भारतीय संविधानातील समता आणि बंधुता या तत्वाबाबत साशंकता निर्माण करून महिलेच्या स्वातंत्र्यावर मनुवादी विचारांनी बंधन घालण्याचा प्रकार केल्याचे एका निवेदनाद्वारे स्पष्ट करून सदर भ्याड व्यक्तीविरूध्द प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक लक्ष्मण पवार यांनी भारतीय बौध्द महासभा पोलादपूर तालुका संघटक व्ही.डी.सोनावणे, वंचित बहुजन आघाडीचे संघटक समीर मोरे व प्रभाकर पवार आदी सहकार्यांसमवेत पोलादपूरचे नायब तहसिलदार शरद आडमुठे यांना या निवेदनाच्या प्रत देऊन पोलादपूर पोलीस ठाणे, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक तसेच महाड उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.
पोलादपूर शहरातील या भिन्नधर्मिय सज्ञान तरूणतरूणींच्या विवाहाबाबत दोन्ही कुटूंबांमध्ये कोणतेही मतभेद नसताना विनाकारण दटावणीपूर्ण पोस्ट लिहिणार्या या विकृत दुकानदाराने समाजमाध्यम पत्रकारिता व राजकीय क्षेत्रातून अनेक प्रकारच्या संधी मिळवून दबाव निर्माण केला आहे. या विकृतीवर वंचित बहुजन आघाडीच्या मागणीमुळे चाप बसेल अथवा कसे, हे येणार्या काळात स्पष्ट होणार आहे.