चेन्नई येथून अपहरण झालेल्या चिमुकल्याची नागपूर लोहमार्ग पोलिसांनी केली सुखरुप सुटका

नागपूर,

चेन्नई येथून अपहरण झालेल्या एका 4 वर्षीय चिमुकल्याची नागपूर लोहमार्ग पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मोनु गरीबदास केवट (26) आणि शिब्बु गुड्डु केवट (22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेने अपहरण झालेल्या चिमुकल्याची सुटका करण्यात आली आहे.

मुलाच्या अपहरण संदर्भात नागपूर लोहमार्ग पोलिसांना चेन्नई पोलिसांकडून सूचना देण्यात आली होती. दोन्ही आरोपी तामिळनाडू एक्सप्रेसने नागपूरमार्गे पुढे जात असल्याची माहिती मिळाली होती. लगेच लोहमार्ग पोलिसांनी संपूर्ण स्टेशनवर कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. तामिळनाडू एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्टेशनवर येताच, लोहमार्ग पोलिसांनी प्रत्येक बोगीची तपासणी सुरू केली. त्याचवेळी त् क्रमांकाच्या बोगीत दोन तरुणांच्या जवळ 4 वर्षीय चिमुकला आढळून आला. लोहमार्ग पोलिसांनी आरोपींची चौकशी केली तेव्हा ते उडवाउडवीचे उत्तर देत होती. त्यामुळे त्यांच्यावर संशय अधिकच वाढल्याने पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली, तेव्हा त्यांनी चार वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन मुलाची सुखरूप सुटका केली आहे. या संदर्भात चेन्नई पोलिसांना सूचना देण्यात आली आहे.

लहान मुलाचे अपहरण करून आरोपी तामिळनाडू एक्सप्रेसने नागपूर मार्गे पुढे जात असल्याची सूचना मिळाली. लगेच लोहमार्ग पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे आणि पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांच्याकडे या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करून, अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार दोन्ही महिला अधिकार्‍यांनी प्लॅन आखला. त्यानुसार तामिळनाडू एक्सप्रेसच्या प्रत्येक बोगी समोर लोहमार्ग पोलीस दलातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तामिळनाडू एक्सप्रेस फलाटावर येताच कर्मचार्‍यांनी वेगाने सर्व बोगींची तपासणी सुरू केली असता, डी1 क्रमांकाच्या बोगीत दोन तरुणांच्या जवळ 4 वर्षीय चिमुकला आढळून आला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!