पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर ते कापडे मार्गावर खैर वाहतूक जप्त

पोलादपूर,

महाड वन परिक्षेत्रातील पोलादपूर तालुक्यातील कापडे गावातील महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर खैर सोलिव लाकुड वाहतूक करताना महाड ढालकाठी येथील पुणे येथून महाबळेश्वर मार्गे पोलादपूर ते पुढे रत्नागिरी खेड जाण्यासाठी निघालेला एक टेम्पो वनविभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत सोलिव खैर लाकडासह ताब्यात घेतला आहे. शुक्रवारी रात्री काळोखात ही कारवाई करण्यात आली.

पोलादपूर तालुक्यात महाबळेश्वरमार्गे कापडेपर्यंत एका टेम्पोमधून सोलिव खैर लाकडाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वनविभागाच्या फिरते पथकाने पाळत ठेऊन शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. यात टाटा 407 टेम्पो (क्रमांक एमएच04 इएल 2288) आणि 2.916घनमीटर आकारमानाचे 3 लाख 47 हजार 47 रुपये किंमतीचे 231 खैर सोलिव नग वाहनासह जप्त करण्यात आले. याप्रकरणी महाड-ढालकाठी येथील टेम्पो चालकमालक गजानन यशवंत दिघे व निलेश गंगाराम साळवी (रा. रेपोली, ता.माणगांव) तसेच सहआरोपी दीपक महाडिक (रा.दापोली, जि.रत्नागिरी) यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक रोहा आणि सहाय्यक वनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक रोहा यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शुक्रवारी सायंकाळी सदर टाटा टेम्पो मौजे कापडे महाबळेश्वर पोलादपूर मार्गावर थांबवून तपासले असता त्यामधे खैर सोलिव लाकडे विनापरवाना आढळून आली. संबंधित वाहनावर वनविभागाच्या फिरते पथकाने कारवाई करत वनक्षेत्रपाल महाड यांचे कार्यालयासमोर वाहन मुद्देमालासह जप्त करून आणले.

ही कारवाई उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल फिरते पथक रोहाचे इच्छात कांबळी, वनक्षेत्रपाल महाड राकेश साहू, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, वनरक्षक पोपट कारंडे, वनपाल पोलादपूर श्याम गुजर, वनरक्षक तपासणी नाका नवनाथ मेटकरी, सचिन मेने व वनरक्षक मच्छिंद्र देवरे, दिलीप जंगम या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.

पोलादपूर तालुक्यातील खैरतोडीसाठी केले जाणारे प्रयत्न या आणि यापूर्वीच्या खैर सोलिव लाकडे जप्त करण्याच्या कारवाईनंतर अद्याप थांबले नसून अनेक जंगलातील खैरतोडीनंतर रातोरात वाहतूक केली जात असल्याने स्थानिक वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जागृत नागरिकांना या अवैध वाहतुकीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास कळविण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!