सहकार क्षेत्राचा स्वाहाकार होऊ नये- देवेंद्र फडणवीस
नंदुरबार,
सहकार क्षेत्राचा स्वाहाकार होऊ नये, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. सहकार क्षेत्राकडे सरकारने लक्ष देऊन अडचणी दूर केल्या पाहिजे, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे सहकार महर्षी पी के अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले असताना बोलत होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पी. के. पाटील यांच्या सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा भाषणात उल्लेख केला. सहकार क्षेत्रात लोक कल्याणासाठी काम व्हावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी फडणवीस म्हणाले, की सहकार क्षेत्रात सुधारणा होण्याची गरज आहे. सहकार क्षेत्रात विशेष साखर कारखान्यांमध्ये अडचणी आहेत. सरकारने त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सहकाराचा स्वाहाकार आणि अपहार होऊ नये. सहकारी संस्था अधिक बळकटीने चालल्या पाहीजेत, याकडेदेखील लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रीया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी बोलणे टाळले!
सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पी.के. अण्णाच्या बोलक्या कार्याचे हे स्मारक आहे. त्यांचे कार्य पुढे चालु ठेवणे, हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे सांगत पी. के अण्णांनी केलेल्या सहकार, शिक्षण आणि समाज कार्याचे त्यांनी कौतुक केले आहे. मात्र, मुख्यमत्र्यांच्या औरंगाबादमधील वक्तव्यावर त्यांनी अधिकचे बोलणे टाळले.
देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग-ेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने एकाच वाहनात प्रवास केला. पुतळ्याचे लोकार्पण केल्यानंतर आदरांजली सभेसाठी हे दोन्ही नेते एकाच वाहनातून गेले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्याचे दिसून आले. या दोन्ही नेत्यांमध्ये आपसात काय चर्चा झाली असेल? चर्चा झाली असेल की नसेल ? नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली असेल? याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहे. या दोन्ही नेत्यांनी याबाबत बोलणे टाळले आहे.
येणार्या काळामध्ये या भागामध्ये खानदेशात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूक होत आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या एकत्र प्रवासाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाआघाडीच्या मित्रपक्षामध्ये कुठलीही नाराजी नाही- जयंत पाटील
महाआघाडीच्या मित्रपक्षामध्ये कुठलीही नाराजी नाही. मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या विधानाबाबत बाकीच्यांनी फार मनावर घेण्याची गरज नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक ठिकाणी असे वक्तव्य करावे लागतात, असे सांगत यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.
मुख्यमंत्री कोणत्या अर्थाने बोलले, त्याच्या मनात काय हे मी सांगू शकत नाही- गुलाबराव पाटील
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री कोणत्या अर्थाने बोलले, त्याच्या मनात काय हे मी सांगू शकत नाही. काम करणारा हा भविष्यातील सहकारी असतोच याच भावनेने मुख्यंमंत्री बोलले असावेत. मात्र आम्ही कार्यकर्ते नेत्यांच्या आदेशाने काम करणारे आहोत.