गुजरात: भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात ’या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; जुन्या सर्व मंत्र्यांना वगळले!

अहमदाबाद,

गुजरात मध्ये भूपेंद्र पटेल सरकारमध्ये नवीन मंत्र्यांनी आज गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळातून विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना वगळून भाजपने धक्कातंत्र दाखवून दिले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज सायंकाळी 4.30 वाजता गांधीनगरमध्ये होणार आहे.

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण मंत्रिमंडळ बदलण्यात आले आहे. भविष्यातील नियोजनाचा भाग म्हणून मंत्रिमंडळात नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. तर काही आमदार हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत.

मुकेश पटेल

मुकेश पटेल सुरतच्या ओलपाड विधानसभेच्या जागेवरून दुसर्‍यांदा आमदार झाले आहेत. मुकेश पटेल हे 2012 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकले होते. तर 2017 मध्ये दुसर्‍यांदा निवडणून आले होते. ते व्यवसायाने बिल्डर आहेत.

किरीट सिंह राणा

किरीट सिंह राणा हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते पहिल्यांदा 1995 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. मात्र, 2017 मध्ये त्यांना काँग-ेसचे उमेदवार चेतन खाचर यांनी पराभूत केले होते. किरीट सिंह हे 1998 ते 2002 पर्यंत गुजरातमध्ये मंत्री होते.

बृजेश मेरजा

काँग-ेसला सोडून भाजपमध्ये जाणारे बृजेश मेरजा यांना भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. गेल्या वर्षी ते काँग-ेसचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झाले. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटीवर विजय मिळविला.

अरविंद रैयाणी

राजकोट ईस्ट विधानसभेमधून पहिल्यांदाच अरविंद रैयाणी हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा 4 जानेवारी 1976 ला जन्म झाला. त्यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग-ेसचे उमेदवार मितुल दोंगा यांचा 23 हजार मतांनी पराभव केला.

नरेश पटेल

गणदेवी विधानसबेमधून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडणून आलेले नरेश पटेल हेदेखील भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात आहेत. पाटीदार समुदायातील लेवा पटेल अशी नरेश पटेल यांची ओळख आहे. नरेश पटेल हे खोडलधाम ट्र्स्ट म्हणजे पाटीदारांच्या कुलदेवी मंदिराचे अध्यक्ष आहेत. पटेल आरक्षण आंदोलनात डॅमेज कंट्रोल करण्याकरिता भाजपने नरेश पटेल यांना राजकारणात पुढे आणले होते. त्यांनी 2017 मध्ये सव्वा लाख मते मिळवून विधानसभा निवडणूक जिंकली.

अशी आहे गुजरात भाजपमधील स्थिती-

मागील मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी अचानक राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पटेल यांना रविवारी सर्व आमदारांनी बहुमताने नेता म्हणून निवडले होते. भूपेंद्र पटेल हे उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे नेते आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!