देवघरात पुजलेले ते नाणे होते पहिल्या महायुध्दातील पूर्वजांच्या मृत्यूचे पदक
पोलादपूर,
गेल्या चार वर्षांपूर्वी तुर्भे खुर्द म्हणजे आताची वझरवाडी-देऊळवाडी येथील एका स्मृतीस्तंभावर सात जणांनी पहिल्या महायुध्दामध्ये प्राणांची बाजी लावल्याचा उल्लेख आढळून आला होता. आता कोतवाल खुर्द येथील उतेकर सकपाळ यांच्या घरामध्ये देवघरांत पुजलेले नाणे हे पहिल्या महायुध्दातील पूर्वजांच्या मृत्यूचे पदक असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे पोलादपूर तालुक्यातील शहिद जवानांच्या संख्यमध्ये गेल्या अनेक वर्षांत भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
पहिल्या महायुध्दाच्या 1914 ते 1919 या कालावधीमध्ये पोलादपूर तालुक्यातील अनेक तरूणांना महायुध्दासाठी बि-टीश साम्राज्य सैन्यामध्ये नेण्यात आले होते. यामध्ये तुुर्भे खुर्द येथील 83 पुरूषांना महायुध्दासाठी नेण्यात आल्याचा व त्यापैकी 7 जण शहिद झाल्याचा उल्लेख वझरवाडी देऊळवाडीतील स्मृतीस्तंभावर आढळून आला आहे. ग्रामविकासमंत्री प्रभाकर मोरे यांच्या कालावधीमध्ये तुर्भे खुर्द ग्रामपंचायतीचे त्रिभाजन होऊन वझरवाडीमध्ये हा देऊळवाडी भाग समाविष्ठ झाल्याने हा स्तंभ आता याठिकाणी आहे. पोलादपूर तालुक्यातील राकट व शूरवीर तरूणांना बि-टीशांनी युध्दासाठी नेल्याच्या अनेक घटना असून महाराष्ट्राचे एकमेव महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांनाही बि-टीश बॉईज कंपनीमध्ये सामील करण्यासाठी नेण्यात आल्याची माहिती दिवंगत सुभेदार बाबू गेनू मोरे यांनी दिली होती.
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल खुर्द येथील उतेकर-सकपाळ यांच्या देवघरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एका वर्तुळाकार कांस्य पदकाची देवाची मुर्ती किंवा टाक असावा, असा समज करून कुलदेवतेच्या मंदिर देवघरात नियमित पुजा केली जात असे. या घरातील काशिराम सकपाळ हे भारतीय सैन्यातून रिटायर्ड होऊन गावी आल्यावर त्यांनी कुलदेवतेची पुजा करताना हे पदक पाहिले आणि त्यांना ही देवाची मुर्ती नसून बि-टीशांनी दिलेले मृत्यूचे पदक असल्याची खात्री पटली. या पदकावर नारायण महिपत उतेकर यांचे नांव असून ते स्वातंत्र्य आणि सन्मानासाठी मृत झाले असा इंग्रजी भाषेतील उल्लेख दिसून आला. यानंतर नारायण उतेकर यांच्यासंदर्भात गुगल सर्चइंजिन वरून माहिती घेतली असता पहिल्या महायुध्दामध्ये थर्ड सेपर्स अॅण्ड मायनर्स म्हणून सेवा करीत असताना 24 मार्च 1917 रोजी मृत झाले. कॉमनवेल्थ वॉरच्या बसरा मेमोरियलच्या पॅनेल 46 आणि 66 मध्ये याबाबत नोंद असल्याचे दिसून आले आहे. कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह कमिशनने या नारायण उतेकर यांच्या मृत्यूची नोंद ठेऊन एका शवपेटीमध्ये सर्व माहिती संकलित केली असल्याचे आढळून आले. याचसंदर्भात कमिशनतर्फे तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कोतवाल येथे येऊन हे पदक नारायण महिपत उतेकर यांच्या कुटूंबियांना प्रदान करण्यात आले असावे, असा अंदाज यावेळी आदिनाथ उतेकर सकपाळ यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पहिल्या कॉमनवेल्थ वॉरदरम्यान स्थापन केलेल्या कमिशनने वझरवाडी देऊळवाडीतील स्मृतीस्तंभ उभारल्यानंतर साधारणपणे 1930 दरम्यान नारायण उतेकर यांच्या कुटूंबियांना दिले असावे, असे यावेळी आदिनाथ उतेकर सकपाळ यांनी सांगितले.
आतापर्यंत रायगड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत उपलब्ध माहितीनुसार पोलादपूर तालुक्यातील खडपी येथील सयाजी जाधव हे दुसर्या महायुध्दातील पोलादपूर तालुक्यातील पहिले शहिद असल्याचा उल्लेख आढळून येत होता. यापाठोपाठ कोंढवीचे अनाजी चव्हाण, भरत मोरे, लक्ष्मण निकम, चिखलीचे तानाजी बांदल, परसुलेचे बाबूराम जाधव, लोहारे पवारवाडीतील सुरेश भोसले, वाकण धामणेचीवाडीतील देऊ सकपाळ, पार्लेतील लक्ष्मण गमरे, तुर्भे खोंडा येथील गणपत पार्टे, आडावळे येरंडवाडीतील गणपत सालेकर, देवपूर येथील संदीप महाडीक, काटेतळीतील गणपत सकपाळ, पोलादपूरमधील राकेश सावंत, कोतवाल रेववाडी येथील दिलीप शिंदे, गोळेगणीतील सुरज मोरे अशा 16 शहिद जवानांचा उल्लेख विविध युध्दजन्य परिस्थितीत तसेच सेवाकाळात देशासाठी मरण पत्करल्याबद्दल भारतीय सेना दलाच्या विविध रेजिमेंटस्कडून केला गेला आहे. यामध्ये अद्याप अनेक अज्ञात शहिद जवानांचा उल्लेख दिसून येत नसल्याचे उघडकीस आले असून वझरवाडीतील देऊळवाडीतील स्मृतीस्तंभावरील उल्लेख करण्यात आलेले ते 7 शहिद कोण याबाबत कोणासही माहिती दिसून आली नाही. मात्र, कोतवाल खुर्द येथील या पदकामुळे पोलादपूर तालुक्यात कोणाकडेही असे पदक आढळून आल्यास त्यावरील नामोल्लेखामुळे तालुक्यातील पहिल्या महायुध्दातील शहिद जवानांची माहिती काढणे शक्य होणार आहे.