32 कोटी खर्चूनही लासुर ते कोपरगाव महामार्गावर खड्डे; पालकमंत्री सुभाष देसाईंची थेट नितीन गडकरींकडे तक्रार
वैजापूर (औरंगाबाद) ,
नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गवरील लासुर ते कोपरगाव दरम्यानचे खड्डे बुजवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन महिन्यापूर्वी तब्बल 32 कोटी रुपये खर्च केले. पण अवघ्या एका महिन्यात या महामार्गाची पुन्हा वाट लागली आहे. आता थेट पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दखल घेतली आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी लासुर ते कोपरगाव महामार्गाच्या कामाची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या महामार्गाच्या कामाची चौकशी करून संबधितांविरुध्द कारवाई करण्याची पालकमंत्र्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.
पालकमंत्र्यांनी काय म्हटले आहे तक्रारीत?
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आलेल्या तक्रारीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे की, नागपूर-मुंबई महामार्ग अत्यंत खराब झाला होता. या महामार्गावरील लासूरगाव ते बेलगावपर्यंत काम संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केले. या कामासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च करण्यात आले. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांतच खड्डे पडून रस्ता खराब होण्यास सुरवात झाली. हा महामार्ग मराठवाडा आणि विदर्भला जाण्यासाठी सोयीचा आहे. या महामार्गावर शिर्डीसह तीन जिल्ह्यातील प्रवाशांचे दळणवळण अवलंबून आहे. त्यामुळे संबंधित कामाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना आदेश द्यावे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
महामार्गावरील कामाबाबत उपस्थित झाले प्रश्न-
नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गवरील लासुर ते कोपरगावच्या कामातून ठेकेदाराने दोन ते तीन महिन्यांत गुणवत्तेचा सर्वांना प्रत्यय दिला. काम केल्यानंतर महामार्ग अथवा रस्त्याची देखभाल, डागडुजी भलेही पाच वर्षे संबंधित ठेकेदाराने करावयाची असते. तशी तरतूदही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे. परंतु याचा अर्थ केलेल्या कामाचे काही दिवसांत पितळ उघडे पडले पाहिजे असा होतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काम सुरू असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी झोपले होते का? स्थानिक राजकीय पक्षांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींसह नेतेमंडळींची ही जबाबदारी नव्हती का? या काळ्या कामात त्यांचा सहभाग होता का? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेषत: प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडून कामाची गुणवत्ता तपासणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांकडे शिवसैनिकांविरोधात केली होती तक्रार-
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग निर्माण कामात शिवसैनिक अडचणी आणत आहेत. विशेषकरून हा प्रकार वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने होत आहे. याकडे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे’, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना ऑगस्ट 2021 मध्ये लिहिले आहे. कंत्राटदार आणि अधिकार्यांना धमक्या दिल्या जात आहेत. काम बंद पाडण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असाही पत्रात उल्लेख आहे.