जान मोहम्मदचे डी गँगशी कनेक्शन, एटीएसची टीम करणार चौकशी; विनीत अग-वाल यांनी दिली माहिती (सुधारित)

मुंबई,

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी जान मोहम्मद हा मुंबईतील धारावीतील राहणारा असून, त्याचे डी गँगशी संबंध असल्याची माहिती एटीएस प्रमुख विनीत अग-वाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, एटीएसच्या चार अधिकार्‍यांची टीम जानची चौकशी करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मुंबई लोकलबाबत अफवा येत असून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जान मोहम्मद शेख या संशयित आरोपीचे वीस वर्षापूर्वी दाऊद गँगशी संबंध होते. वीस वर्षांपूर्वी तो दाऊदसाठी काम करत होता. या लिंकमुळेच ही व्यक्ती महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर होती. मात्र सध्या दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडे कोणतीही स्फोटके किंवा हत्यार सापडले नाहीत, असे अग-वाल यांनी सांगितले.

जान मोहम्मद शेखने निजामुद्दीनला जाण्यासाठी तिकीट बुक केले होते. पण, हे तिकीट कन्फर्म न झाल्यानेच दोन दिवसांनंतर स्लीपर कोचने जान मोहम्मदने निजामुद्दीनसाठी प्रवास केला. मुंबई सेंट्रलपासून जान मोहम्मदने प्रवास सुरू केला. मुंबईतून निघालेल्या जानला राजस्थानमधून दिल्ली पोलिसांनी अटक केली. जान हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यानंतर जान मोहम्मदने टॅक्सी खरेदी केली होती, पण हप्ते न भरल्यानेच त्याची टॅक्सी गेली. त्यानंतर एक टू व्हीलरही खरेदी केली होती. मात्र, आर्थिक अडचणी वाढल्याने जान डी गँगच्या संपर्कात आल्याची शक्यता अग-वाल यांनी व्यक्त केली. जान मोहम्मदच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी आम्ही संपर्क साधल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जान या व्यक्तीला मुंबई निजामुद्दीन प्रवासादरम्यान राजस्थानच्या कोटा येथून अटक करण्यात आली आहे. पण या संपूर्ण प्रकरणात एकही विस्फोटक किंवा हत्यारही सापडले नाही. त्यामुळे, महाराष्ट्र पोलिसांचे अपयश मानत नाही, असे विनीत अग-वाल यांनी सांगितले. या प्रकरणात इंटेलिजन्स एजन्सीकडून ही माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारच वेगवेगळ्या ठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी या संशयित दहशतवाद्यांना एकाचवेळी अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाशी संबंधित दिल्ली पोलिसांसोबत बोलणे सुरू आहे. लवकरच या प्रकरणाची चौकशी केली जाईल. मात्र, आपल्याला याबाबत एफआयआर मिळाला नसून दिल्ली पोलिसांकडून तो अपेक्षित असल्याचे अग-वाल यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य आणि मुंबई शहर हे संपूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे कोणत्याही दहशतवादी कारवाईवर महाराष्ट्र एटीएसचे नियंत्रण असल्याचा दावा विनीत अग-वाल यांनी केला. आमच्या रडावर अनेक लोक हे दहशतवादी कारवायांच्या निमित्ताने असतात. पण, या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई ही स्वतंत्र होती. महाराष्ट्र एटीएसला यामुळे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच, मुंबई लोकल किंवा मुंबईतील ठिकाणे ही दहशतवाद्यांच्या रडारवर होती, ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मुंबईत कोणतीही रेकी झाली नसल्याचेही अग-वाल यांनी स्पष्ट केले. मुंबईत कोणतीही स्फोटके किंवा हत्यार सापडले नाहीत, त्यामुळे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र सुरक्षित असल्याचे अग-वाल यांनी सांगितले.

दिल्लीमध्ये महाराष्ट्र एटीएसची एक टीम जाणार असून ती जान मोहम्मदची चौकशी करेल, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही अलर्टशिवाय दिल्ली पोलिसांनी ही कारवाई राजस्थानच्या कोटा येथे केली, असेही त्यांनी स्पष्ट केले. जान मोहम्मदवर याआधी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये एक प्रकरण हे 2010 सालचे वीजचोरीचे आहे. तर, एका प्रकरणात फायरिंगच्या प्रकरणात त्याच्याविरोधात केस आहे. सध्या न्यायालयात दोन प्रकरणे न्याय प्रविष्ठ असल्याचे अग-वाल यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!