मराठा आरक्षण : जालन्यातील परतुर येथे युवकाची आत्महत्या

परतूर (जालना),

तालुक्यातील येनोरा गावाच्या एका 25 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सदाशिव भुंबर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सदाशिव भुंबर हा पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. त्याने इलेक्ट्रिशिअनचा कोर्स केलेला होता. नोकरी मिळत नसल्याने महिनाभरापूर्वी तो गावाकडे आला होता. त्याच्याकडे चार एकर जमीन आहे. मात्र, गावाकडे यंदा जास्त पाऊस असल्याने शेतातील पिकेही वाया गेली आहे. त्यातच मंगळवारी घराच्या छताच्या लोखंडी अँगलला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

चिठ्ठीत लिहिले आत्महत्येचे कारण –

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्याने मृत्यूपूर्वी चिट्ठी लिहून ठेवली आहे. त्यानंतर त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याचे चुलते अंकुश भुंबर यांनी सांगितले. दरम्यान, आष्टी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सदाशिवच्या आत्महत्येनंतर परतुरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!