लाखो रुपयांच्या मुकुटासोबत बाप्पाचं विसर्जन! 12 तासांनंतर तलावात शोधमोहिम

वसई,

वसईतील विवेक पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना बाप्पा चांगलाच पावला आहे. बाप्पाच्या मूर्तीसोबत साडेपाच तोळं सोन्याचा मुकुटाचं (बाशिंग) देखील तलावात विसर्जन करण्यात आलं होतं. मात्र हे लक्षात आल्यानंतर 12 तासानंतर तलावातून ते परत मिळालं आहे.

वसईच्या उमेळमान गावात राहणारे विवेक पाटील, जे पालघर जिल्ह्याचे शिवसेना सह सचिव आहेत. त्यांच्या घरी पाच दिवसांचा गणपती विराजमान होतो. मात्र यंदा बाप्पा विराजमान झाल्यानंतर शनिवारी 11 तारखेला त्यांच्या काकाचा मुलगा मयत झाला. त्यामुळे त्यांना सुतक लागलं होतं. सुतक लागल्याने बाप्पाची सेवा घरातील कुणी करु शकत नसल्याने पाटील कुटुंबांनी दीड दिवसाच्या गणपतीसोबत घरच्या बाप्पाची मूर्ती विसर्जित करण्याचं ठरवलं.

यासाठी त्यांच्या जवळच असलेल्या उमेळमान येथील तरुणांना सांगून मूर्तीच विसर्जन करण्यात आलं. मात्र रात्री घरच्यांना आठवण झाली की, गणपतीच्या डोक्यावर जे मुकुट (बाशिंग) होतं ते सोन्याच होतं. आणि ते ही मूर्तीसोबत तलावात विसर्जित झालं आहे. जवळपास साडेपाच तोळ्याचं ते मुकुट असून, त्याची आजची किंमत तीन लाखाच्या घरात होती. घरच्यांनी 1997 साली ते बनवलं होतं. त्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंताग-स्त झालं होतं.

अखेर त्यांनी पाणजू गावात संपर्क केला. तेथून कळलं की, विरारच्या काशिद कोपर गावातील उत्कृष्ट स्वीमर असलेला सदानंद भोईर हा याच उमेळमान गावात आला आहे. सदानंद मुकुटाचा शोध घेण्यासाठी तलावात उतरला मात्र तरीही अडचण ही होती की दीड दिवसाच्या विसर्जनावेळी जवळपास 96 गणपतीचं या तलावात विसर्जन झालं होतं. आता खोल पाण्यात जाऊन या 96 विसर्जित केलेल्या गणपतींपैकी सोन्याचं मुकुटधारी मूर्ती शोधायची आणि तो सोन्याचा मुकुट बाहेर काढायचा होता. सदानंद भोईर याला अखेर एका तासानंतर यश आलं. मुकुटधारी गणपतीची मूर्ती अखेर सापडली आणि विवेक पाटील यांचं तीन लाख किंमती आभूषण त्यांना परत मिळालं. या घटनेनंतर बाप्पांचे आभारच पाटील कुटुंबियांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!