गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची भूपेंद्र पटेल यांनी घेतली शपथ

अहमदाबाद,

भारतीय जनता पक्षाचे आमदार भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते विजय रुपाणी यांच्याजागी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणार आहेत. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव-त यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे.

विजय रुपाणी यांनी राज्य विधानसभा निवडणुकीच्या 15 महिने अगोदर शनिवारी पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. रविवारी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांची सर्वसमंतीने नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. पटेल यांनी गुजरातचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पटेल यांचे कोठेही नाव नव्हते. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा होताच राजकारणात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यपालांनी दुपारी शपथविधीसाठी दिले होते आमंत्रण

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव-त यांना पटेल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी रविवारी आमंत्रित केले होते. भूपेंद्र भाई पटेल यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव भाजपने राज्यापालांसमोर ठेवला होता. हा प्रस्ताव स्वीकार करून राज्यपालांनी 13 सप्टेंबरला दुपारी 2 वाजून 20 मिनिटाला मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले होते.

पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्र्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिशा-निर्देशानुसार आणि पटेल यांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासयात्रेला नवीन उर्जा व गती मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. याबाबत त्यांनी टिवट केले आहे. भाजप प्रवक्त्याच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी रविवारी फोन करून भूपेंद्र पटेल यांचे अभिनंदन केले. दरम्यान, पटेल यांना गुजरात सरकारमध्ये कधीही मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली नव्हती.

पुढील 14 महिने नव्या मुख्यमंत्र्यांसाठी आव्हानात्मक

मुख्यमंत्री झाल्यावर भुपेंद्र पटेल यांच्या पुढील 14 महिने हे महत्वाचे असणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीला फक्त 14 महिने शिल्लक आहेत. निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे. यात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भूपेंद्र पटेल यांना पाटीदारातील दोन्ही कुळ म्हणजेच, कडवा आणि लेउवा पटेल यांची मुठ बांधावी लागेल. काही महत्वाची पावले उचलावी लागेल, जेणेकरून राज्यातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर, 2022 मधील निवडूक ही भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याने ती आव्हानात्मक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. त्यामुळे पुढील निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.

भूपेंद्र पटेल हे तळागाळातून वर आलेले नेते

पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांची पक्षाचे मृदुभाषी कार्यकर्ता अशी ओळख आहे. विशेष म्हणजे, ते तळागळातून वर आलेले नेते आहे. नागरपालिकेपासून त्यांनी राजकारणात प्रवेश करत आज मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यांनी 2017 साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढवली होती. अहमदाबादच्या घाटलोदिया येथून त्यांनी निवडणूक लढवत 1 लाख 17 हजार विक्रमी मतांच्या फरकाने विजय मिळवला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!