गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड
गांधीनगर,
गुजरातला भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. गांधीनगरमध्ये आज रविवारी दुपारी 3 वाजता भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती देण्यात आली. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते. नरेंद्र सिंह तोमर यांनी बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली. कोण आहेत भूपेंद्र पटेल?
नवनियुक्त मुख्यमंत्र्याचं भूपेंद्र भाई रजनीकांत पटेल असं पूर्ण नाव आहे. भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोडिया या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. याच मतदारसंघातून गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आंनदीबेन पटेल विजयी झाल्या होत्या. याआधी पटेल हे अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष होते. तसेच पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं आहे.