ख्रिस्ती बांधवांची प्रतिपंढरी हरेगावात सेंट मेरी जन्मोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा

अहमदनगर (शिर्डी),

ख्रिश्चन धर्मीय बांधवांची प्रतिपंढरी अशी ख्याती असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथील पवित्र तीर्थक्षेत्री प्रभू येशू ख्रिस्त यांच्या मातोश्री संत मारिया (सेंट मेरी) यांचा जन्मोत्सव सोहळा आज कोरोना नियमांचे पालन करून साधेपणाने परंतु परंपरेप्रमाणे उत्साह आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे.

देशात संत मारिया यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी मद्रास (वेलकनी), मुंबई (माऊंट मेरी) येथे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र महाराष्ट्र राज्याच्या सामान्य आर्थिक गटातील ख्रिस्त बांधवांना तेथे जाणे शक्य नसल्याने फादर बाखर यांनी 73 वर्षांपूर्वी मंदीर उभारून या सेंट मेरी जन्मोत्सवाला सुरुवात केली. ही परंपरा आजही जोपासली जाते.

संत मारिया माता ‘आपले गार्‍हाणे ऐकून त्यांची इच्छापूर्ती करते‘ अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे खरे तर दरवर्षी हरेगाव येथे महायात्रा भरविली जाते. त्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने पायी चालत येणार्‍या स्त्री-पुरुष भाविकांची येथे मोठी रिघ लागलेली असते. त्यात तरुणांचाही मोठा सहभाग असतो.

धार्मिक विधीची परंपरा कायम ठेऊन यंदाही अतिशय साधेपणाने हा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. हरेगाव चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर सुरेश साठे यांच्या हस्ते मारिया मातेला मानाचा मुकुट घालण्यात आला. चर्च परिसरात तसेच संत मारिया डोंगरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!