मुंबई, पुण्यापाठोपाठ उल्हासनगर हादरलं; उल्हासनगरमध्ये हातोड्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

उल्हासनगर,

मुंबई, अमरावती, वसई आणि पिंपरीमधील बलात्काराच्या घटनांनी अवघा महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनांना अवघ्या काही तासांचाच अवधी लोटला असतानाच आता उल्हासनगरमध्येही अमानुष घटना घडली आहे. उल्हासनगर स्थानकानजिक एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. हातोड्याचा धाक दाखवत आरोपीनं तरुणीवर बलात्कार केला.

कल्याणमध्ये एका 14 वर्षीय मुलीला हातोड्याचा धाक दाखवत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही मुलगी शिर्डीला आईला भेटून परतत होती. या 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीला उल्हासनगर रेल्वे स्थानकावरील स्कायवॉकवर हातोड्याचा धाक दाखवत तिला निर्जनस्थळी नेण्यात आलं. त्यानंतर तिथं मुलीवर बलात्कार करण्यात आला. काल (शुक्रवारी) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रेल्वे परिसरात घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.

पीडित अल्पवयीन तरुणी उल्हासनगर परिसरात आपल्या आजीसोबत राहते. ती आपल्या आईला भेटण्यासाठी शिर्डीला गेली होती. शिर्डीवरून काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ती बसनं कल्याणपर्यंत आली. कल्याणमधून ती लोकलनं उल्हासनगर स्थानकात पोहोचली. उल्हासनगर स्थानकात उतरल्यानंतर स्कायवॉकवर तिला काही मित्र भेटल्यानं ती त्यांच्यासोबत बोलत उभी होती. याच दरम्यान श्रीकांत गायकवाड हा माथेफिरू तरुण तिथे आला त्यानं हातातील हातोडीनं तिच्या मित्रांना धाक दाखवत पळवून लावलं. त्यानंतर या तरुणीलाही हातोड्याचा धाक दाखवत जबरदस्तीनं स्थानकाच्या बाजूला असलेल्या पडक्या वसाहतीच्या जवळ नेलं. पीडित अल्पवयीन तरुणीनं विरोध केला मात्र आरोपीनं तिला मारहाण करत तिच्यावर अमानुष बलात्कार केला. यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दुपारी बलात्कार करणार्‍या नराधामला अटक केली आहे. तसेच पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मुंबईतही दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती पहायला मिळाली होती. मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेवर आधी टेम्पोसमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. ते म्हणाले की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!