एलअॅण्डटी ठेकेदार कंपनीच्या अकल्पनीय कामामुळे पोलादपूरला महामार्ग ढासळतोय!
पोलादपूर,
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर कोणत्याही नियोजनाअभावी एलअॅण्डटी ठेकेदार कंपनी केलेल्या अकल्पनीय कामामुळे अंडरपासच्या खंदकात सर्व्हिसरोडच्या लालमातीचे ढिगारे मंगळवारी रात्री खंदकात कोसळू लागल्याचे दृश्य पाहण्यास मिळाले. सोमवारपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्या गणेशभक्तांच्या वाहनांच्या रांगा महामार्गावर ट्राफिक जॅममुळे खोळंबा होऊन थांबल्याचे दृश्य दिसू लागले असताना मंगळवारी रात्री पोलादपूर शहरातील महामार्ग ढासळू लागल्याने ऐन गणेशोत्सव काळात या खंदकालगतचे सर्व्हिसरोड कमकुवत होऊन महामार्ग गायब होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. माजी आमदार स्व.माणिक जगताप यांनी या अंडरपास रस्त्याला कडाडून विरोध केला होता.
मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर शहरातील अंडरपास बॉक्स कटिंगच्या खंदकात पश्चिमेचाही सर्व्हिस रोड ढासळला आहे. पुर्वेकडील सर्व्हिस रोड वरून सध्या मुंबई आणि गोव्याकडे अशी दुहेरी वाहतूक केली जात आहे. नुकत्याच झालेल्या मानवी साखळी आंदोलनावेळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वीर ते पोलादपूर कशेडी घाटातील चौपदरीकरणासाठीची ठेकेदार एलअँडटी कंपनीकडून सुमार दर्जाचे काम करण्यात आल्याकडे सर्वच आंदोलनकर्त्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले होते.
गणेशोत्सवापूर्वी पोलादपूर येथील महामार्गावरील वाहतूक केवळ 130 मीटर रुंदीच्या पुर्वेकडील सर्व्हिस रोडवरून होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याखेरीज, या अवजड वाहनांमुळे सर्व्हिस रोडच्या लाल मातीचे ढिगारे खंदकात कोसळू लागले आहेत. पोलादपूर शहरातील चौपदरीकरणाचे काम खंदकातून सुरू आहे. मात्र, खंदकात संरक्षक भिंती न बांधल्याने लाल मातीचे ढिगारे कोसळू लागले आहेत ज्या बाजूस पुर्वेकडील सर्व्हिस रोड आहे आणि फक्त या एकाच सर्व्हिस रोडवरूनच सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू आहे. पोलादपूर शहरात भुसंपादित जमिनींचा संपूर्ण ताबा घेऊन चौपदरीकरणाचे काम सुरू न केल्यास ऐन गणेशोत्सव काळात अंडरपास साठी केलेल्या बॉक्स कटिंग खंदकात वारंवार लाल मातीचे ढिगारे कोसळून सर्व्हिस रोड कमकुवत होणार आहे.
पोलादपूर शहरातील चौपदरीकरणातील मंजूर आराखड्यात केवळ एकच व्हेइक्युलर बि-ज नमूद असताना आणखी चार बि-ज उभारण्यात आले आहेत. महामार्गासाठी खणलेल्या खंदकात लाल मातीचे ढिगारे कोसळू नये, यासाठी काँक्रीटच्या फोमचे तीन लेयर देण्यात येणार असून यापैकी दोन लेयर दिल्यानंतर हा सर्व्हिस रोड अंडरपास बॉक्स कटिंगच्या खंदकात मंगळवारी रात्री कोसळला आहे. एकीकडे, विद्यामंदिर पोलादपूर येथील भूसंपादित जमिनीवर चक्क काँक्रीटची संरक्षण भिंत घालण्यात आली असताना दुसरीकडे चौपदरीकरणातील अंडरपास बॉक्सकटींग रस्त्यावर वारंवार ढासळणार्या लालमातीच्या ढिगार्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केवळ काँक्रीटचे फोमिंग आणि लोखंडी जाळी लावण्याचा प्रकार एलअँडटी ठेकेदार कंपनीने चालविला आहे. यामुळे नजिकच्या काळात फोमिंगसह संपूर्ण पूर्वेकडील सर्व्हिसरोड या अंडरपास बॉक्सकटींगच्या खंदकामध्ये वारंवार कोसळण्याच्या घटनांत वाढ होणार आहे. याखेरिज, सर्व्हिसरोडवरील वाहनेदेखील खंदकांमध्ये कोसळण्याची शक्यता या तकलादू काँक्रीट फोमिंगच्या तंत्रामुळे निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील चौपदरीकरणाच्या कामाचे बिल अदा करण्यापूर्वी ब्लूम कंपनीज एलएलसी युएसए महाड ही गुणनियंत्रण कंपनी कशाप्रकारे झालेल्या कामाचा आढावा घेत असेल, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
महाड येथील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उपविभागामार्फत पेण येथील राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला बिल सादर होऊन सदरचे बिल मुख्य अभियंता तथा प्रादेशिक अधिकारी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नवी मुंबई यांच्याकडून बिलापोटी रक्कम अदा होण्यासाठी सादर केले जात असते. यामुळे महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिक जगताप यांनी थेट नवी मुंबई येथे मुख्यअभियंता तसेच मंत्रालयामध्ये बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांची भेट घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळासोबत जाऊन या अंडरपास रस्त्याला कडाडून विरोध केला होता. यामुळे सद्यस्थितीत होणारे विरोध आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर स्व.माणिक जगताप समर्थक कोणती भुमिका घेऊन पोलादपूरकरांना या अंडरपासच्या खंदकात कोसळणार्या रस्त्यापासून वाचविणार अथवा कसे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.