देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर, दिलं थेट आव्हान

मुंबई,

बेळगाव महापालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं. बेळगाव निकालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. बेळगावमध्ये मराठी माणसाचा नाही तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर आात संजय राऊत यांनी भाजपाला थेट आव्हानच दिलं आहे.

महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे, तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या, अस टिवट करत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपला थेट आव्हान

याबरोबरच संजय राऊत यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. त्यांनी आपल्या टिवटमध्ये म्हटलं आहे, महाराष्ट्र भाजपा कडून दोन अपेक्षा आहेत

1 – बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा

2 – बेळगाव पालिकेत महाराष्ट्र त विलीन होण्या बाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा. आहे मंजूर? अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराच! असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.

बेळगाव महानगरपालिकेवरुन भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरु असून आता संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हानाला भाजप काय उत्तर देणार हे पहावं लागेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!