श्रीमंत सईबाई राणीसाहेब स्मारकाच्या पाल गावास पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
सातारा,
पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात पाल या गावामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या प्रथम पत्नी व छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती सौ. सईबाई राणीसाहेब भोसले यांची समाधी आहे. गेले बरेच वर्षे हा समाधी परिसर दुर्लक्षित झालेला होता. ह्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती सौ. सईबाई राणीसाहेब भोसले यांच्या स्मारकाच्या माध्यमातून पाल गावचा व परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
पाल, ता. वेल्हे, जि. पुणे येथे श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब भोसले यांच्या समाधी स्मारकाचे भूमिपूजन विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अरविंद पासलकर, पाल गावचे सरपंच गोरख शिर्के, कुलदीप कोंडे, बापुसाहेब धुमाळ, करणसिंह बांदल, अण्णा देशमाने, दत्ताजी नलावडे, प्रदिप मरळ, सौरभ आमराळे, अमोल पाटणकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांची स्मारक आधी का केले नाही ? याच्या खोलात जाण्यात आता काहीही उपयोग नाही. छत्रपती सईबाई राणीसाहेबांचा इतिहास चार ओळींच्या वर का लिहिला गेला नाही ? या बाबत माझ्या मनामध्ये कायम खंत राहिली आहे. सईबाई राणीसाहेबांच्या समाधीच्या स्मारकाच्या बाबतीत जी काही पुढील जबाबदारी आहे, ती आता मी स्वत: उचलली आहे. या गावाला पर्यटन स्थळ म्हणूनच विकसित करण्यासाठी आगामी काळामध्ये प्रयत्न करणार आहे. नुसतं समाधी किंवा स्मारक बांधून उपयोग नाही तर त्याचे संवर्धन करणे सुद्धा गरजेचे आहे, असेही मत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
इतिहासामध्ये दुर्लक्षित झालेल्यांच्या नावामध्ये श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांचे नाव सुद्धा होते. याबाबतची खंत माझ्या मनात होती. फलटणला ऐतिहासिक वारसा आहे. फलटण तालुक्याच्या मुरुम गावामध्ये मल्हारराव होळकर यांचे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे काम हे कायम स्मरणात राहिल. आता पुढील कामासाठी मी तयारीला लागलेलो आहे. श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांची समाधी आता बांधण्यासाठी मी व्यक्तिश: प्रयत्न करणार आहे. श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांची समाधी बांधण्यासाठी आपण सर्व गावकर्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या बद्दल आभार व्यक्त करतो असे सांगून आगामी काळामध्ये गावकर्यांची मदत मला गरजेचीच आहे, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेबांच्या स्मरण दिनानिमित्त आपण सर्व जण एकत्रित आलेलो आहोत. मावळचा इतिहास कुणी वेगळा सांगण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास आणि मावळ्यांचा इतिहास हा वेगळा नसुन एकत्रितपणेच पुढे जात आहे. लहानपणी शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत होतो. इतिहासाच्या खाणाखुणांचे जर आपण जतन केले नाही तर काळाच्या ओघात गडप होण्याची शक्यता आहे, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
श्रीमंत छत्रपती सईबाई राणीसाहेब स्मारकाची माहीती प्रास्ताविकात गणेश खुटवड – पाटील यांनी दिली. स्मारकाचे वास्तुरचनाकार अमोल पाटणकर यांचा विशेष सत्कार या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.