ऑॅक्सिजन घेणारा आणि सोडणारा गाय हा एकमेव प्राणी: अलाहाबाद उच्च न्यायालय

अलाहाबाद

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, गाय हा एकमेव प्राणी आहे जो ऑॅक्सिजन घेतो आणि ऑॅक्सिजनच सोडतो. त्याचबरोबर गायीचे दूध, दही आणि तूप, गौमूत्र आणि शेणापासून तयार केलेले पंचद्रव्य अनेक असाध्य रोगांसाठी फायदेशीर असल्याचे बुधवारी दिलेल्या एका निकालात अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी हे निरीक्षण नोंदवले. जावेदवर त्याच्या साथीदारांसोबत मिळून तक्रारदार खिलेंद्र सिंहच्या गायीची चोरी आणि हत्या केल्याचा आरोप आहे.

आपल्या निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की, गायीमध्ये हिंदू धर्मानुसार 33 कोटी देवी-देवतांचे वास्तव्य आहे. ॠग्वेदात गायीला अघन्या, यजुर्वेदमध्ये गौर अनुपमेय आणि अथर्ववेदात संपत्तीचे घर म्हटले गेले आहे. भगवान श्रीकृष्णाला सर्व ज्ञान गायींकडून मिळाले. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, एखादी गाय किंवा बैलाला मारणे, हे मानवाला ठार मारण्यासारखे असल्याचे येशूने म्हटले आहे. तर, तुम्ही मला मारा पण गाईला मारू नका, असे बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते. तसेच पंडित मदन मोहन मालवीय यांनी संपूर्ण गोहत्या बंदीची बाजू मांडली होती. भगवान बुद्धांनी गायीला माणसाचा मित्र म्हटले. तर जैन लोकांनी गायीला स्वर्ग म्हटले आहे. भारतीय राज्यघटना तयार करताना, संविधान सभेच्या अनेक सदस्यांनी मूलभूत अधिकारांमध्ये गोरक्षणाचा समावेश करण्यात यावा, असे म्हटले होते.

शतकानुशतके हिंदू धर्मीय गायीची पूजा करत आहेत. इतर धर्मातील लोक देखील हे मान्य करतात आणि यामुळेच मुघलांच्या काळात इतर धर्मातील नेत्यांनी गोहत्येला कडाडून विरोध केला होता. हे सांगण्याचा हेतू हाच की देशातील बहुसंख्य मुस्लिम नेतृत्व नेहमीच गोहत्या बंदीच्या देशव्यापी बंदीच्या बाजूने आहे. ख्वाजा हसन निजामी यांनी एक चळवळ सुरू केली होती. त्यांनी ‘तार्क ए गाओ कुशी’ नावाचे एक पुस्तक लिहिले, ज्यामध्ये त्यांनी गायींची हत्या न करण्याबद्दल लिहिले होते. स्र-ाट अकबर, हुमायूं आणि बाबर यांनी त्यांच्या राज्यात गाईची हत्या करू नये, असे आवाहन केल्याचे न्यायालयाने सांगितले.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात गोहत्या बंदीसाठी केंद्रीय कायदा आणण्याची मागणी जमीयत-ए-उलेमा-ए-हिंदचे मौलाना महमूद मदानी यांनी केली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता, गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची आणि हिंदूंच्या मूलभूत अधिकारांमध्ये गोरक्षणाचा समावेश करण्याची गरज आहे. गायीचे जेव्हा कल्याण होईल, तेव्हाच या देशाचे कल्याण होईल आणि कधीकधी गाईच्या संरक्षण आणि संवर्धनाविषयी बोलणारेच गायीचे भक्षक बनतात हे खूप वेदनादायक असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!