मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठिकठिकाणी अपूर्ण; कशेडी घाटातील भुयारी मार्ग चालला आहे पूर्णत्वाकडे
पोलादपूर,
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंडीपासून पेण हद्दीतील कोलेटी गावापयर्ंतचे तसेच लोणेरे पासून टेमपाले लाखपाले वीरपयर्ंत चौपदरीकरणासाठीचे भूसंपादन रखडलेल्या अवस्थेत असल्याने प्रत्यक्ष कामाला गती दिसून येत नाही. दुसरीकडे, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील पर्यायी भुयारी मार्ग पुढीलवर्षी पुर्ण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. चौपदरीकरणाचे काम आर्थिक चणचणीमुळे भुसंपादन न झाल्याने ठप्प झाले असल्याचे नॅशनल हायवे ऑथारिटी ऑफ इंडियाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांनी जन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर स्पष्ट करून जन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंडीपासून पेण हद्दीतील कोलेटी गावापयर्ंतचे चौपदरीकरणासाठीचे भूसंपादन अद्याप रखडलेले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांनी जनआंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कोविड 19 काळातील नियमांचा हवाला देत आंदोलनाला कोविड पार्श्वभूमीवर आलेल्या निबर्ंधाचा पाढा पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी एका पत्राद्वारे वाचल्यानंतर कर्मधर्म संयोगाने पोलादपूर येथील आपत्तीनिवारणकामी प्रतिनियुक्तीवर ते पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये आले असता रायगड जिल्हा अध्यक्ष पालकर यांनी त्यांची जनआंदोलनावर ठाम असल्याचे मत मांडले. यानंतर नॅशनल हायवे ऑथारिटी ऑफ इंडिया आणि संबधित ठेकेदार यांनी प्रशासनासोबत बैठक घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांच्यासोबत जो पत्रव्यवहार केला तो धक्कादायक आहे. या सुकेळी खिंडीपासून नागोठणेजवळील कोलेटीपयर्ंतच्या रखडलेल्या भुसंपादनाचे कारण आर्थिक चणचण असल्याचे उत्तर या पत्राद्वारे दिले गेले. कोकणातील पत्रकारांनी वारंवार आंदोलनं करून साकारल्या जाणार्या या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी आर्थिक चणचण हा विषय संयुक्तीक नसल्याने या पत्रोत्तराला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर यांनी केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठविल्यानंतर आता याबाबत भरीव आर्थिक तरतुदीची अपेक्षा आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापैकी एक भुयार नुकतेच आरपार झाले असून दुसरे भुयारही लवकरच आरपार होऊन या वर्षअखेरिस, भुयारीमार्गाचे काम पूर्ण होऊन 2022 मध्ये लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती या भुयारी मार्गाचे इन्चार्ज नितीन रंजन यांनी प्रत्यक्ष भुयारी मार्गाचे कामकाज दाखविताना दिली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 हा गेल्या अनेक वषार्ंपासून अपघातप्रवण क्षेत्र म्हणून सर्वपरिचित आहे. यातही पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाचे वर्णन ज्येष्ठ पत्रकार आणि मार्मिकचे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी यमलोकाचा दरवाजा असे केले होते.
बि-टीशकालीन महामार्ग स्वातंर्त्योत्तर काळामध्ये नुतनीकरण झाल्यानंतर पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्याहस्ते तातडीने उदघाटनाच्या आणि लोकार्पणाच्या अट्टाहासापायी तत्कालीन मंत्री स.का.पाटील यांनी घाईमुळे त्यावेळी झालेल्या काँक्रीटीकरणाची पुर्णत: विल्हेवाट लागली. पुन्हा डांबरीकरण करून हा महामार्ग वाहतुकीस पुर्ववत करण्यात आला. यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा पहिला विचार कोकणाचे कैवारी व भूमिपुत्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांनी मांडला आणि तत्कालीन केंद्रीय भुपृष्ठ वाहतुकमंत्री पी.चिदंबरम यांनी त्यास मान्यता दिली होती. त्यावेळी बॅरिस्टर अंतुले यांनी संपूर्ण महामार्गाचे रूंदीकरण जसे आहे तसे या पध्दतीचे करण्याचा आग्रह केंद्रसरकारकडे केला होता. मात्र, यापूर्वी बॅरिस्टर अंतुले हे राज्यात बांधकाममंत्री असताना त्यांनी कशेडी घाटातील अपघातप्रवण क्षेत्राची तीव-ता लक्षात घेऊन संपूर्ण महामार्ग आंबेतमार्गे वळविण्याचा विचार मांडला असताना त्यांना त्यानंतरच्या काळात पेणचे अंध आमदार भाई शेटये यांनी विरोध केला आणि कशेडी घाटातील महामार्ग कायम ठेवावा असे फलक लावून जोरदार विरोध केला होता असे पोलादपूर ग्रुपग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरिफ धामणकर सांगतात. मात्र, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्वीप्रमाणेच कशेडी घाटातून मार्गस्थ झाला आणि अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच गेले. अनेक लोक मृत्यूमुखी पडले असंख्य लोक जायबंदी झाले. कधी पेट्रोलचे तर कधी ज्वालाग्रही रसायनांचे टॅकरही पलटी झाले. वित्त आणि जिवितहानी मोठया प्रमाणावर झाली. साधारणपणे 2006च्या दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरदिवशी सरासरी 3 जणांचा मृत्यू होऊ लागला आणि जखमींची संख्या अधिक दिसून येत असल्याने कोकणातील पत्रकारांनी केवळ बातम्या देण्याऐवजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा विचार आंदोलनाद्वारे सर्वतोमुखी केला. या आंदोलनाचे प्रमुख केंद्र अर्थातच कशेडी घाट होते.
2009 मध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास मान्यता मिळाली आणि पत्रकारांनी पेण येथे विजयीउत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला. मात्र, तेवढयावर भागणारे नव्हते. प्रत्यक्षात हे काम कसे व्हावे, कोकणवासियांना त्यांच्या भुसंपादनाचे मोबदलेही व्यवस्थित मिळावे, असे अनेक विषय महत्वपूर्ण होते. पुढे संघर्ष होत राहिले काही स्थानिकांचे काही सेवाभावी कार्यकर्त्यांचे… काही ठिकाणी व्यक्ती तितक्या प्रकृती न्यायाने कायमचे नुकसानही सोसावे लागणार आहे. बॅ.अंतुले यांनी सुचविलेले जसे आहे तसे यापध्दतीचे रूंदीकरण या चौपदरीकरणावेळी नसल्याने फ्लायओव्हर, अंडरपास, बॉक्स कटींग वगैरे सुरू झाले.
मात्र, अशातच, पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून भुयारी मार्गाची निविदा निघाली आणि या चौपदरीकरणाच्या कोंदणातील हा भुयारी मार्ग हिरा ठरणार आहे हे स्पष्ट झाले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चे चौपदरीकरण सुरू असून या कशेडी घाटामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भारतीय पध्दतीचा भुयारी मार्ग खणून रस्ता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घाटातील प्रस्तावित 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निविदा मंजूर झाल्याने स्विकारले असून 441 कोटी रुपयांचा खर्च याकामी होणे अपेक्षित आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 म्हणजेच पुर्वीचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 च्या पुनर्वसन आणि सुधारणेसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2018 यावर्षी अभियांत्रिकी प्रॉक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन यांच्यासोबत 502 कोटी 45 लाख रुपयांचा करार केला आहे. त्यामुळे कशेडी घाटातील प्रस्तावित बोगदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनविताना तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहेत. यातील करारानुसार 7.2 किलोमीटर लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित असून या रस्त्याचे कामदेखील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच करीत आहे.कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गासाठी एक अत्याधुनिक भुयार खोदकामाचे यंत्र म्हणजेच बुमर वापरण्यात येत असून याद्वारे तीन ते चार मीटर लांबीचे कातळ फोडले जात आहे. 20 मीटर रुंदी आणि 6.5 मीटर उंची अशा पध्दतीने भुयारी मार्गाचे खोदकाम करण्यास बूमर यंत्राचा उपयोग होत आहे. भुयारी मार्गामध्ये महत्वाच्या ठिकाणी सुरुंग स्फोटासाठी जिलेटिनचा वापर केला जात असून भुयारामध्ये पडलेले कातळ व मोठमोठे दगड बाहेर काढण्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर केला जात आहे. हे कातळाचे दगड मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामांमध्ये वापरण्यात येत असून दोन्ही भुयारी मार्ग एकमेकांपासून वेगवेगळे असणार आहेत. या कामाची पाहणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 14 जुलै 2019 रोजी अभियंत्यांसोबत केली असून तब्बल दोन वषार्ंच्या कालावधीने दोनपैकी एक भुयार आरपार खुले झाले आहे.
या कामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे तसेच या भुयारी मार्गाच्या दुतर्फा ऍप्रोच रस्ते तयार करण्यात आले आहेत. आपत्कालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील यामध्ये समाविष्ट असून पोलादपूर बाजूच्या पहिल्या अर्धा किमी. अंतराच्या टप्प्यामध्ये दोन्ही भुयारी मागार्ंना जोडणार्या कनेक्टिव्हिटीचा भुयारी मार्ग तयार झाला असून आतील भागात परत युटर्न घेणार्या वाहनांसह अपघातग्रस्त वाहनांना बाहेर काढण्याची सुविधा या कनेक्टिव्हिटी भुयारीमार्गाने होणार आहे. यासोबतच आपतकालामध्ये उपयुक्त असलेले वायुविजन सुविधेचे एक भुयारदेखील यामध्ये समाविष्ट आहे.2019 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेले हे काम एप्रिल 2021 पयर्ंत पूर्ण होण्याची अपेक्षा असताना कोरोना काळामध्ये कामगार आपआपल्या राज्यात धाडण्यात आल्याने तीन महिने काम रेंगाळले असले तरी या वर्षअखेरिस दुसर्या भुयारांचे कामही पूर्ण होऊन अंतिम बांधकाम पूर्ण होऊन अपेक्षेपेक्षा एक वर्ष उशिराने लोकार्पणासाठी सज्ज होणार आहे.
पुढील वर्षी 2022 मध्ये या भुयारी मार्गापयर्ंत जाणार्या काँक्रीट रस्त्याचे तसेच भुयाराच्या आतील भागातील काँक्रीटीकरणासह खेडबाजूकडे 4 पूल आणि पोलादपूरबाजूकडे तीन पुल उभारण्याचे काम झाल्यानंतर ऍप्रोच रस्ता पूर्ण होणार आहे. आगामी 2022 मध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग किमान कोकणापयर्ंत रस्ता आणि पुल तसेच भुयारासह परिपूर्ण होऊन लोकार्पण होईल, अशी अपेक्षा आहे.