थेट समुद्रातच पर्यटकाने नेली चारचाकी
पणजी,
पर्यटनासाठी पर्यटकांचे आवडते स्थळ म्हणजे गोवा. येथील शांत व स्वच्छ समुद्रकिनारे, निरव शांतता आणि लयबद्ध संगीतावर मद्याचे पेग रिचविणे ही येथील संस्कृती. गोव्यात येणारे देशी विदेशी पर्यटक येथील पर्यटनाचा आनंद लुटत असतात, मात्र काही बेजबाबदार पर्यटकांमुळे याला गालबोट लागते. काही पर्यटक दारू पिऊन धिंगाणा घालतात तर काहीजण इतरांची शांतता भंग करतात. यामुळे येथील स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. बुधवारी तर एका कार चालकाने आपली कार चक्क मांद्रे समुद्रकिनार्यावर पाण्यात नेली. त्यानंतर ती कार वाळूत अशा रितीने अडकून बसली की त्याला शेवटी दुपारपर्यंत भरती ओसारण्याची वाट पाहावी लागली
बुधावरी सकाळच्या सुमारास एका कारचालकाने आपली कार मांद्रे समुद्रकिनार्यावर नेली. मात्र त्याने अतिउत्साहीपणा करत ती कार समुद्राच्या पाण्यात चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र घडले भलतंच. समुद्राच्या पाण्यातील वाळूत ती कार अडकून पडली. त्यातच गाडीच्या अर्ध्या उंचीपर्यंत लाटा आदळत असल्यामुळे त्याला ती गाडी तिथेच बंद करून बाहेर पडावे लागले. मात्र दुपारच्या सुमारास भरतीचे पाणी कमी झाल्यावर त्या कार चालकाने आपली गाडी बाहेर काढली.