ईडीच्या कारवाईवर खासदार भावना गवळी म्हणाल्या, हा तर जुलमीपणा…
वाशिम,
वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे आज शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या विविध संस्थांवर ईडीने छापे टाकले. हा जुलमीपणा असून, मला कुठलीही आधी नोटीस देण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया खासदार भावना गवळी यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील भाजप आमदाराने 500 कोटींचा घोटाळा केला असून, त्याचीही ईडी चौकशी लावा, अशी मागणी खासदार गवळी यांनी केली आहे.
शिवसेनेला भाजप टार्गेट करत आहे –
वाशिमर्यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी 2019 मध्ये चोरीला गेलेल्या सात कोटी रुपयांची चोरीची तक्रार 2020 मध्ये दिली. मात्र, सात कोटी रुपये आले कुठून? असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला आहे. सोबतच खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्या संदर्भात केलेल्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही यावेळी सोमैया यांनी केला होता. आज खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर ईडीचे अधिकारी पोहचले असून, चौकशी सुरू आहे.
खासदार भावना गवळी यांना यासंदर्भात विचारले असता, किरीट सोमैया यांनी केलेल्या तक्रारीची कितीही चौकशी केली तरी यामध्ये काही आढळणार नाही. शिवसेनेच्या मागे विनाकारण ईडी लावत असल्याचे भावना गवळी यांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर कारंजाचे भाजप आमदार यांनी वाशिममध्ये 500 कोटी रुपयांचा भ-ष्टाचार केल्याचे पुरावे दिले. मात्र, त्यावर चौकशी लागली नसून, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भावना गवळी यांनी केली आहे.