किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर भावना गवळींच्या शिक्षण संस्थांवर ईडीची कारवाई, 5 ठिकाणांवर छापेमारी
यवतमाळ,
रविवारी शिवसेना नेते अनिल परब यांनी ईडीनं नोटीस पाठवली. त्यानंतर आज यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीकडून गवळी यांच्या संस्थेत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ येथील संस्थांवर धाडी टाकल्या. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्याचं समजतंय. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे ईडीनं या धाडी टाकल्याचं समोर येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग-ो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीनं धाडी टाकल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या वाशिमच्या दौर्यावर होते. भाजपने भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे.
भावना गवळी यांची थोडक्यात ओळख?
वयाच्या 24 व्या वर्षी भावना गवळी यांनी लोकसभेत प्रवेश केला. विदर्भातील शिवसेनेच्या तडग्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. 2019 मध्ये सलग पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून आल्या. 2004, 2009, 2014 आणि 2019 असा त्यांचा लोकसभेचा आतापर्यंतचा कार्यकाळ आहे. माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्या त्या सर्वात लहान कन्या आहेत.