लोकांनी प्रार्थना करायला मातोश्रीवर जायचं का? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल
मुंबई,
कोरोना महामारीमुळे राज्यातील मंदिरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. राज्यातील बंद असलेली मंदिरे लवकरात उघडावी या मागणीसाठी भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मंदिरे बंद असल्यामुळे लोकांनी मातोश्रीवर जाऊन प्रार्थना करायची का? असा संतप्त सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनामुळे राज्य सरकार संध्याकाळपर्यंत मंदिरे उघडण्याचे आदेश देईल असा इशार्याही त्यांनी यावेळी दिला. ते आज पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा परिसरात आंदोलन सुरु आहे. आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून लवकरात लवकर मंदिरे उघडावे अशी मागणी करत आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, मंदिरे पूर्णपणे बंद ठेवणे चुकीचे आहे. कोरोनाचे नियम घालत मंदिरे उघडायला हवी. मंदिरात एकाचवेळी फक्त दहा जणांना परवानगी द्या, ते बाहेर आल्याशिवाय दुसरे दहा जण आत जाणार नाही. सोशल डिस्टेन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदी सक्तीचे करा. पण मंदिरे उघडा असे चंद्रकांत पाटील म्हणाले. कारण मंदिर हा फक्त श्रद्धेचा विषय नसून तो रोजगाराचाही स्त्रोत आहे असे ते म्हणाले.
भाजपचे आंदोलन केवळ एकच धर्मासाठी नसून ते सर्वंच धर्मियांसाठी असल्याचे पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आता लवकरचं जैन धर्मियांच पर्युषण पर्व सुरु होईल. मुस्लीम समाज नमाज अदा करण्यासाठी मस्जिदीत जातो. ख्रिश्चन धर्मियांनादेखील चर्चेमध्ये जायचं असत त्यामुळे आमचं हे आंदोलन सर्व धर्मांसाठी असल्याचे आंदोलनादरम्यान म्हणाले. जर तुम्ही मंदिरे उघडत नसाल लोकांनी काय मातोश्रीवर जाऊन प्रार्थना करायची का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.