पंढरपुरात नामदेव पायरीजवळ भाजपचे आंदोलन; मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते ताब्यात
पंढरपूर,
राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावी या मागणीसाठी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी जवळ शंखनाद आंदोलन सोमवारी करण्यात आले. आंदोलन सुरू असताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्व पदाधिकार्यांनी श्री विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून मध्यस्थी करण्यात आली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
सकाळी नऊच्या सुमारास भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीजवळ शंखनाद करत आंदोलनाला सुरूवात केली. यावेळी पदाधिकार्यांकडून भजन-कीर्तनही या ठिकाणी करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मंदिरे खुली करण्याची मागणी लावून धरली. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर खुले करावे. तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवून मंदिरात भाविकांना प्रवेश द्यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
आंदोलनादरम्यान अचानकच भाजपच्या पदाधिकार्यांनी नामदेव पायरी येथून विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने भाजप पदाधिकार्यांचा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. यावेळी पोलिसांनी भाजप आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.