इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडियात मोठे बदल, कोणाला डच्चू मिळणार?
मुंबई,
इंग्लंडने टीम इंडियाचा तिसर्या कसोटीत चौथ्या दिवशीच डाव आणि 78 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. या सामन्यात काही अपवाद वगळता टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजांसह गोलंदाजांनाही त्यांच्या लौकीकाला साजेशी करता आलेली नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंट चौथ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत नव्या चेहर्यांना संधी मिळणार आहे.
कोणाला संधी कोणाला डच्चू?
विराटने तिसर्या कसोटीत ऑॅलराऊंडर आर अश्विनला न खेळवता रवीचंद्रन जाडेजावर विश्वास दाखवला. विराटच्या या निर्णयावरुन चांगलीच टीका करण्यात आली. त्यात जाडेजाला तिसर्या कसोटीच्या दुसर्या दिवशी गुडघ्यात दुखापत झाली. त्यानंतर जाडेजा उपचारांसाठी रुग्णालयात गेला. या दुखापतीमुळे जाडेजाचं पुढीलं 2 कसोटीत खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे जाडेजाच्या जागी आश्विन चौथ्या कसोटीत खेळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.
इशांत शर्माला बाहेरचा रस्ता?
इशांत शर्मा टीम इंडियाचा महत्त्वाचा आणि अनुभवी गोलंदाज आहे. मात्र इशांत या तिसर्या कसोटीत सपशेल अपयशी ठरला. इशांतला या कसोटीत एकही विकेट घेता आली नाही. तसेच त्याने 4 च्या सरासरीने धावा दिल्या. इशांतला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे इशांतऐवजी मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला चौथ्या कसोटीत संधी मिळणार का, याकडे सर्वाचं लक्ष असणार आहे.
अजिंक्य-पुजाराचं काय?
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे टीम इंडियाचे महत्त्वाचे आणि हुकमाचे एक्के आहेत. चेतेश्वर पुजाराने तिसर्या कसोटीतील दुसर्या डावात 91 धावांची खेळी केली. पुजाराचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले. मात्र पुजाराला नेहमीप्रमाणे सुर गवसत नाहीये. तर अजिंक्य रहाणे सातत्याने अपयशी होतोय. त्यामुळे या दोघांनाही पुढील सामन्यासाठी विश्रांती द्यावी, असं म्हटलं जातंय. त्यामुळे अजिंक्य रहाणेऐवजी सूर्यकुमार यादव तर पुजाराच्या जागी हनुमा विहारीला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.