मुस्लीम व्यक्तीला ’जय श्रीराम’ म्हणण्याची जबरदस्ती; उज्जैनमध्ये दोघांना अटक

उज्जैन,

मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मुस्लीम व्यक्तीला जबरदस्तीने ’जय श्रीराम’ बोलण्यास भाग पाडल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. मुस्लीमेत्तर परिसरात जाऊन भंगार गोळा करत असल्याने संबंधित मुस्लीम व्यक्तीला समाजकंटकांनी जबरदस्तीने जय श्रीराम बोलण्यास भाग पाडले.

या घटनेचे एकूण 2 व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये तरूण संबंधित मुस्लीम व्यक्तीच्या गाडीतून भंगार सामान बाहेर काढताना दिसून येत आहेत. तर दुसर्‍या व्हिडिमध्ये ते व्यक्तीला ‘जय श्री राम’ चा नारा देण्यासाठी जबरदस्ती करताना दिसतात.

व्हिडिओमध्ये सुरुवातील काही तरूण एका मुस्लीम व्यक्तीला ‘जय श्री राम’चा नारा देण्यासाठी जबरदस्ती करताना दिसून येतात. तर ती व्यक्ती घाबरलेली आणि जय श्री राम’चा नारा देण्यास तयार नसल्याचं स्पष्ट दिसून येतं. मात्र, तरुणांनी खूप जास्त सक्ती केल्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्या इच्छेविरुद्ध ‘जय श्री राम’ चा नारा देते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या तरुणांविरोधात अनेक अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत.

याप्रकरणावरून काँग-ेस नेते दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेश सरकारवर टीका केली आहे. हे गुन्हेगारी कृत्य नाहीये का? असा सवाल दिग्विजय सिंह यांनी प्रशासनाला केला. या युवकांवर कारवाई कधी होणार, आता हद्द पार होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

संबंधित तरुणांना उज्जैन पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्तीचे नाव अब्दुलर राशीद असून ते महिदपुर परिसरातील रहिवासी आहेत. भंगारचा व्यवसाय ते अनेक वर्षांपासून करत आहेत. तर आरोपींची नावे कमल सिंग (22) आणि इश्वर सिंग (27) असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी आर.आर. के राय यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!