’…तर मलाही ’प्रहार’ सुरू करावा लागेल’; नारायण राणे यांचा इशारा
कणकवली,
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज कणकवलीत होती. त्यावेळी त्यांनी विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरही राणे यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले.
’माझ्या जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेल्यासारखे मध्ये-मध्ये काही अपशकुन झाले. त्यानंतर आता अग-लेख येत आहेत. कोणाच्या मुलांवर बोलण्यापेक्षा आपली मुले किती पराक्रमी आहेत. हे त्यांनी पहावं. संजय राऊत तुमच्या मालकाची मुलं काय करीत आहेत ते आधी पहा. संजय राऊत आम्हाला बोलायला प्रवृत्त करीत आहेत. राऊत यांच्यामुळे शिवसेना वाढत नाहीये. ती अधोगतीकडे चालली आहे. ’सामना’ची प्रतिमा बौद्धिक वर्गात चांगली नाही. असा घणाघात राणे यांनी केला.
’राऊत यांनी माझ्या मुलांची बरोबरी करू नये. माझे त्यांच्यावर नियंत्रण आहे. संजय राऊत यांनी वयक्तिक गोष्टींवर बोलणं थांबवलं नाही तर, मलाही ’प्रहार’मधून लिखान सुरू करावे लागेल. कोणाचं बसणं उठणं कोणाबरोबर आहे. कोणाचे कोणत्या खटल्यांशी संबध आहेत. हे सगळं बाहेर काढेन. असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.
’अनिल परब पोलिसांना असे आदेश देतात जसे की, पंतप्रधान किंवा राष्ट्रपती आहेत. पोलिसांना मला अटक करण्यासाठी दम भरतात. शिवसेनेत नारायण राणे विरूद्ध बोलले की पदे मिळतात.
शिवसेना घडवण्यात आमचाही हात
शिवसेना घडवण्यात आमचाही हात आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवाला धोका असताना बाळासाहेब सरकारी आदेशानुसार अज्ञातवासात होते. त्यावेळी मी त्यांच्यासोबत अज्ञातवासातील पूर्ण दिवस सोबत होतो. या दिवसांमध्ये मी झोपलो देखील नव्हतो. अशी आठवणही राणे यांनी करून दिली.