कुडाळमध्ये नारायण राणेंच्या समक्षच शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
सिंधुदुर्ग,
नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी (दि. 28 ऑगस्ट) रात्री उशिरा कुडाळ शहरात दाखल झाल्यानंतर, ही यात्रा येथील शिवसेना शाखेसमोरून जात असताना शिवसेना शाखेसमोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप झाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळ शिवसेना शाखेसमोरून जात असताना शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीने जन आशीर्वाद यात्रेला विरोध केला. आमदार वैभव नाईक यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, संतोष शिरसाट, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्यासोबतच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे जामसंडे येथे आगमन झाल्यानंतर देवगड शिवसेना कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी पहिल्यांदाच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नारायण राणेंचा सध्या सिंधुदुर्ग दौरा सुरू आहे. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम, माजी सभापती रविंद्र जोगल, संदेश पटेल, हर्षद गावडे, संतोष तारी व अन्य शिवसैनिक शिवसेनेचा झेंडा उंचावून शिवसेना जय घोषच्या घोषणा देत होते.