पोलादपूर तालुक्यातील नद्यांजवळचा सर्पांचा अधिवास गेला वाहून; सरपटणारे प्राणी आलेत लोकवस्त्यांमध्ये

पोलादपूर,

22 जुलै 2021 रोजी सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील ढवळी, कामथी, घोडवनी, चोळई आणि सावित्री या नद्यांची पात्रं तुडूंब भरून लोकवस्ती आणि शेतजमिनींमधून वाहू लागली आणि या नद्यांजवळील सरपटणार्‍या प्राण्यांचा अधिवासही पुर्णपणे वाहून गेल्याने सरपटणारे प्राणी लोकवस्त्यांच्या आश्रयाला आल्याचे दिसून आले आहे.

या अतिवृष्टीमधील पुर काळामध्ये ग्रामीण भागात अनेक सर्प तसेच सरपटणार्‍या प्राण्यांची बिळं आणि राहण्याची ़ठिकाणे वाहून गेली असताना पोलादपूर शहरालगत वाहणार्‍या उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्राचा वेग प्रचंड असूनही या पात्रालगत सपाटीवर लोकवस्ती असल्याने काही सर्प व तत्सम सरपटणारे जीव वाहून आल्याने एकतर नागरिकांकडून भितीपोटी मारले गेले अथवा सर्पमित्रांनी त्यांना जीवदान दिल्याच्या घटना ऐकण्यास मिळत आहे.

पोलादपूर शहरातील सिध्देश्वर आळीमधील स्विकृत नगरसेवक राजन पाटणकर यांच्या घरापासून काही अंतरावर उत्तरवाहिनी सावित्री नदी असून चोळई नदीचे अतिवृष्टीदरम्यान तयार होणारे पात्र काही फुट अंतरावर आहे. सोमवारी रात्री या घरालगतच्या एका झाडावर अजगर चढले असताना खाली काँक्रीटच्या रस्त्यावर कोसळल्याचा आवाज आला. यावेळी तब्बल एक पाच ते साडेसहा फूट लांबीचे अजगर आढळून आल्याने दिनेश दरेकर, स्वप्नील वंडकर, वैभव वंडकर, गणेश येरूणकर, विकी सागवेकर आदी सर्पमित्रांनी अजगराला काळजीपूर्वक पकडून पिशवीमधून महाबळेश्वर रस्त्यावर आंबेनळी घाटामध्ये रात्रीच सोडले.

पोलादपूर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये मण्यार, घोणस तसेच नाग आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली. याखेरिज तालुक्यात फुरसे, नाणेटी, कांडर, धामण आदी साप आढळून येतात. याखेरिज, खारूताई, मुंगूस तसेच घोरपडीसारखे सरपटणारे प्राणीही त्यांचे अधिवास गमावल्याने बेघर झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे. लगतच्या काळात श्रावण महिन्यामध्ये उन्ह-पावसाचा खेळ सुरू असताना सर्प आणि सरपटणार्‍या प्राण्यांना अधिवास गमावल्यामुळे लोकवस्तीमध्ये आल्यानंतर गारव्याला सावलीला आसरा घेतल्यावर नागरिकांना वाटणार्‍या सापांबाबतच्या भितीमुळे जीव गमवावा लागत असल्याचे दिसून आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!