तिरुपती मंदिरात प्लास्टिक बंदी, डीआरडीओच्या खास बॅगमधून मिळणार प्रसाद

नवी दिल्ली,

देशातील श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती येथील मंदिरात यापुढे प्लास्टिकचा वापर केला जाणार नाही. भाविकांना प्रसादाचे लाडू या पुढे डीआरडीओ ने तयार केलेल्या खास प्रकारच्या बॅग मधून दिले जाणार आहेत. या पिशव्या बायोडीग-ेडेबल मटेरियल पासून बनविल्या गेल्या असून त्या पर्वावरण पूरक आहेत. डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी या संदर्भात म्हणाले, ‘ डीआरडीओ हैद्राबाद’ च्या आधुनिक सिस्टीम प्रयोगशाळेत धोकादायक प्लास्टिकला सर्वोत्तम पर्याय शोधला गेला आहे. दीर्घ संशोधन त्यासाठी केले गेले आहे.

एकवेळा वापर होणार्‍या प्लास्टिक बॅग पर्यावरणाला धोका निर्माण करतात. त्याला पर्याय म्हणून या बॅग मक्याच्या स्टार्च पासून बनविल्या गेल्या आहेत. या पिशव्या 90 दिवसानंतर आपोआप नष्ट होतात आणि जनावरांच्या पोटात त्या गेल्या तरी त्यापासून कोणताही अपाय होत नाही. तिरुमला हे देश विदेशातील प्रसिद्ध मंदिर असून येथे दररोज लाखोंच्या संखेने भाविक येतात. त्यांना या पिशव्यातून प्रसाद दिला जाईल. नेहमीच्या वापरातल्या प्लास्टिक पिशव्या डीकंपोज व्हायला 200 वर्षापेक्षा अधिक काळ लागतो आणि त्यामुळे पर्यावरणासाठी त्या धोका ठरतात.

तिरुपती देवस्थान कार्यकारी अधिकारी, डीआरडीओ अध्यक्ष सतीश रेड्डी, डॉ. के जवाहर रेड्डी यांच्या उपस्थितीत मंदिरात रविवारी या नव्या पिशव्यांच्या विक्रीसाठी विशेष कौंटर उघडले गेले असून भाविकांचा कसा प्रतिसाद मिळतो यावर पूर्ण विक्री योजना आखली जाणार आहे असे समजते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!