अनिल देशमुखांच्या अडचणीत अधिकच वाढ, दोन सहकार्यांवर आरोपपत्र दाखल
मुंबई,
आर्थिक अफरातफर आणि गैरव्यवहार प्रकरणात अडकलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आतापर्यंत 5 वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख हे ईडीच्या चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. आता मनी लाँडरिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्याविरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत अधिकच भर पडणार आहे.
कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 25 जून रोजी या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुरुवातीला त्यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून हे दोघं तुरुंगात आहेत. ईडीच्या नियमानुसार अटक झाल्यानंतर 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करणं अनिवार्य असतं. त्यानुसार आता या दोघांवर आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय ईडीनं घेतला आहे.
या आरोपपत्रात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे असल्याची माहिती मिळत आहे. बार मालकांचा जवाब, सचिन वाझेचा जबाब, इतर बोगस कंपन्यांबाबतचे पुरावे आणि अनिल देशमुख यांच्या संस्थेत आलेल्या पैशांचे पुरावे या आरोपपत्रात असल्याचं सांगितलं जात आहे.
ईडीकडून पाच वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीला हजर झालेले नाहीत. न्यायालयीन चौकशी संपल्याशिवाय आपण ईडीच्या चौकशीला सामोरे न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी एक पत्रक काढून जाहीर केलं आहे. ईडीच्या कारवाईविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून तिथं आपल्याला कनिष्ठ न्यायालयात जाण्याची परवानगी मिळाली असल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे. न्यायालयातील निर्णय झाल्यानंतर आपण स्वत: ईडीसमोर चौकशीसाठी हजर होऊ, असं देशमुखांनी म्हटलं आहे.