न केलेल्या चुकीसाठी सौदी अरेबियात 600 दिवसांचा तुरुंगवास, कर्नाटक पोलिसांच्या तपासानंतर झाली सुटका

बंगळुरू,

सौदी अरेबियात काम करणार्‍या एका भारतीय नागरिकाने न केलेल्या चुकीची मोठी शिक्षा भोगली आहे. एका वादग-स्त फेसबुक पोस्टसाठी या भारतीय व्यक्तीला सौदी अरेबियाच्या प्रशासनानं अटक करून तुरुंगात टाकलं होतं. मात्र त्याची काहीच चूक नसल्याचं कर्नाटक पोलिसांच्या तपासातून दिसून आल्यानंतर त्याची अखेर सुटका झाली आहे.

काय होतं प्रकरण?

सौदी अरेबियात एअर-कंडिश्नर टेक्निशिअन म्हणून काम करणार्‍या 34 वर्षांच्या हरीश बंगेरा यांना एका फेसबुक पोस्टसाठी अटक करण्यात आली होती. 22 डिसेंबर 2019 पासून ते सौदीच्या तुरुंगात खितपत पडले होते. मक्का आणि सौदी अरेबियाचा राजा यांच्याविषयीच्या वादग-स्त पोस्टचा संदर्भ पकडत त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आपण ही पोस्ट केलीच नसल्याचा त्यांचा दावा होता.

कर्नाटक पोलीस आणखी एका प्रकरणातील फेक अकाऊंटवरून करण्यात आलेल्या फेसबुक पोस्टचा तपास करत होते. त्यावेळी सौदी अरेबियात अटक झालेल्या बंगेरा यांचं फेक प्रोफाईल तयार करून दोघांनी ही पोस्ट केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. अब्दुल हुयेज आणि अब्दुल थुयेज या उडपी जिल्ह्यातील दोघांनी हा प्रकार केला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर तपासाची चक्रं फिरली आणि या दोघांना पोलिसांनी अटक केली.

कर्नाटकमधील या केसचा संदर्भ बंगेरा यांच्या कुटुंबीयांनी सौदी अरेबियातील प्रशासनाला देत हरीश यांची अटक गैरसमजातून करण्यात आल्याचं सिद्ध केलं. त्यानंतर सौदी अरेबियाच्या तुरुंगातून हरीश बंगेरा यांची सुटका करण्यात आली. सौदी अरेबियातून बुधवारी हरीश बंगेरिया हे बंगळुरू विमानतळावर उतरले. आपल्या सुटकेबद्दल त्यांनी कुटुंबीयांचे आणि कर्नाटक पोलिसांचे आभार मानले आहेत. तब्बल 600 दिवसांच्या तुरुंगवासानंतर आता मोकळा श्वास घेत असल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!