केवळ बोलल्याने बेकारी जात नाही, शिवाजी पार्कातून नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई,
केवळ बोलल्याने बेकारी जात नाही, त्यासाठी काम करावे लागते, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मी 16-16 तास काम करतो, असं सांगतानाच राणेंनी उमेदीच्या काळातील राजकीय घटनांच्या आठवणी सांगितल्या.
काय म्हणाले राणे?
मी दीड महिन्यांनंतर दिल्लीतून मुंबई आलो आहे, असं सांगताना जनआशीर्वाद यात्रेला औपचारिक सुरुवात झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. मी तीन वेळा मुंबईतून नगरसेवक झालो. बराच पल्ला गाठला. मला जवळपास 10 पदं मिळाली. इतरांना 1 पदही मिळत नाही, असा टोमणा त्यांनी लगावला. आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून चांगलं काम करणार असल्याचं सांगत उद्योजकता निर्माण करणार असल्याचं ते म्हणाले.
नारायण राणे यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या समाधीचं दर्शन घेतलं. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर आणि शिवाजी पार्कमधून राणेंनी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंच्या या टीकेकडं पाहिलं जात आहे. या दौर्यात त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अनेक दिग्गज नेतेदेखील उपस्थित होते. फडणवीस, दरेकर आणि इतर नेत्यांच्या साथीनं या निवडणुकीत भाजपची सत्ता आणणार असल्याचा निर्धार राणेंनी व्यक्त केला.
नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर ते शिवसेनेविरोधात अधिक आक्रमक होतील, असा अंदाज राजकीय विेषकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणार्या शिवाजी पार्कपासून राणेंनी जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली असून ही यात्रा मुंबईतील वेगवेगळ्या भागात जाणार आहे. या दरम्यान, नारायण राणे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी नारायण राणेंनी याची झलक दिली आहे.