’शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात’, महापौर किशोरी पेडणेकरांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर
मुंबई,
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने तयारीला सुरुवात केली असून सत्ताधारी शिवसेनेच्या समोर थेट नारायण राणे यांचं आव्हान भाजपने पुढे केले आहे. त्यामुळे शिवसेनेला ही निवडणूक कठीण जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. तसेच जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. या टीकेचा समाचार मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आहे.
येणार्या निवडणुकीत मुंबई महापालिका तुमच्या हातात राहणार नाही असे नारायण राणे म्हणाले. राणेंच्या आव्हानाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘शिवसेना कधीच कोणती निवडणूक सोपी समजत नाही. निवडणूक कठीणच असते आणि शिवसेनेला कठीण पेपर सोडवायला आवडतात‘, असे म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री होते तेव्हा पापाचा घडा दिसला नाही का?
गेली 32 वर्षांपासून शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता आहे. मात्र अजूनही मुंबईकरांच्या जीवनात काही बदल झालेले नाहीत. 32 वर्षाचा पापाचा घडा फोडणार अशी राणेंनी भाषा केली आहे. देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु या 32 वर्षात राणे स्वत: मुख्यमंत्री झाले, महानगरपालिकेचे सदस्य होते. मग तेव्हा पापाचा घडा दिसला नाही का? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.
नारायण राणेंचा राजकीय प्रवास सर्वांना माहिती आहे
जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले अशी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना महापौर पेडणेकर म्हणाल्या, ’मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलण्याआधी त्यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला, मुंबईला कसं सांभाळलं आहे हे सर्वांनी पाहिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. नारायण राणेंचा राजकीय प्रवास काय आहे ते सर्वांनाच माहित आहे.