पुणे पोलीस आयुक्तालयासमोर एका 40 वर्षीय व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं, पत्नीचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
पुणे,
पुणे पोलिसांच्या संवेदनाहीन आणि गलथान कारभारामुळे एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतलं आहे. सुरेश पिंगळे असे या चाळीस वर्षीय व्यक्तिचे नाव आहे. पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
सुरेश पिंगळे हे पुण्यातील ए आर डी ए या शासकीय संस्थेत कंत्राटी पद्धतीवर काम करतात. दरवर्षी कंत्राट नूतनीकरण करण्यासाठी त्यांना पोलिसांकडून त्यांच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचे व्हेरिफिकेशन करुन घ्यावे लागते. या वर्षीच्या व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसाठी त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला . मात्र सुरेश पिंगळे नावाच्या व्यक्तीवर तीन गुन्हे नोंद असल्याच त्यांना सांगण्यात आलं. सुरेश पिंगळेंनी तो व्यक्ती वेगळा असल्याचं आणि एकाच नावाच्या दोन व्यक्ती असल्याचे सांगितलं. मात्र पोलीसांनी दाद दिली नाही.
सुरेश पिंगळे अनेक दिवस पुणे पोलिसांना भेटून त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी दाद दिली नाही. त्यामुळे निराश होऊन त्यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोर स्वत:ला पेटवून घेतले ज्यात ते गंभीर भाजले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुरेश पिंगळे यांनी पुणे पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांना भेटून त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोणीच दाद दिली नाही असं त्यांच्या पत्नीने म्हटले आहे. पोलिसांनी अडवणूक केली आणि त्यामुळे सुरेश पिंगळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला असा आरोप शामल पिंगळे यांनी केला आहे. बुधवारी (18 ऑॅगस्ट) अकरा – साडेअकरा वाजता पुणे पोलीस आयुक्तालयात हा प्रकार घडल्यानंतर सुरेश पिंगळे यांना आधी ससून रुग्णालयात आणि त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं पत्नीशी बोलताना त्यांनी खडकी पोलीस स्टेशनमधील पोखरकर नावाच्या महिला पोलीस कर्मचार्याने त्रास दिल्याचं म्हटलंय .
स्वत:ला पेटवून घेतल्याने सुरेश पिंगळे गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान शामल पिंगळे यांचे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु आहे आणि या तपासात जर कोणी दोषी आढळलं तर कारवाई करू अशी प्रतिक्रिया दिली आहे.