सामान्यांना मोठा झटका, पुन्हा महागला घरगुती गॅस सिलेंडर; आता मोजावी लागणार एवढी किंमत
नवी दिल्ली,
सामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका मिळाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना-सबसिडी असणार्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सोमवारी रात्रीपासून लागू करण्यात आली आहे. शक्यतो महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीच्या किंमती बदलतात, मात्र आता पुन्हा एकदा एलपीजी गॅसचे दर वाढल्याने सामान्यांना मोठी फटका बसणार आहे.
सरकारी तेल कंपनी इंडियन ऑॅइल कॉरपोरेशनने सबसिडी नसणार्या 14.2 किलोग-ॅमच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. परिणामी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 859.5 रुपये झाले आहेत. याआधी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर प्रति सिलेंडर 834.50 रुपये इतके होते.
या वाढीनंतर मुंबईत दर एलपीजी गॅस सिलेंडरचे 859.5 रुपये आहेत, दिल्लीतही 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचे दर एवढेच आहेत. तर कोलकाता आणि लखनऊमध्ये दर अनुक्रमे 886 रुपये आणि 897.5 रुपये आहेत. दरम्यान 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीतही 68 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 1618 रुपये झाली आहे. गेल्या महिन्यातच तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25.50 रुपयांची वाढ केली होती.