योगी सरकार घालणार आणखी एका शहराचं बारसं; आता अलिगढचंही होणार नामकरण, काय असेल नवं नाव ?

लखनऊ,

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आत्तापर्यंत आपल्या राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांची नावं बदलली आहेत. सत्तेत आल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यातील शहरांची नावं बदलण्याचा तडाखाच लावला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वी इलाहाबादचं ‘प्रयागराज’ तर फैजाबादचं ‘अयोध्या’ असे नामकरण केलं आहे. यानंतर आता अलीगढचं नाव बदलण्याचा देखील प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे. जिल्हा पंचायत बोर्डाच्या बैठकीत अलीगढचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच अलीगढचं नाव बदलण्यात येणार आहे.
अलीगढचं नाव बदलून हरिगढ करण्याचा हा प्रस्ताव आहे. नामकरण करण्याबाबत जिल्हा पंचायतीची ही बैठक सोमवारी पार पडली आहे. नवनियुक्त अध्यक्ष विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विकास भवन सभागृह परिसरात सर्व सदस्यांच्या उपस्थितीत अलीगढ जिल्ह्याचं नाव बदलून हरिगढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केहरी सिंह आणि उमेश यादव यांनी मांडला होता. या बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान सर्वांनीच नाव बदलण्याच्या बाजूने मतं दिली आहेत.
खरंतर, यापूर्वी 2015 मध्ये अलीगढचं नाव बदलण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली होती. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेनं अलीगढचं नाव हरिगढ सुचवलं होतं. तेव्हा विहिंपच्या नेत्यांचं म्हणणं होतं की, अलीगढचं प्राचीन नाव हरिगढच होतं. परंतु ते नंतर बदलण्यात आलं होतं.
याव्यतिरिक्त मैनपुरीमध्येही जिल्हा पंचायतीच्या सदस्यांनी मैनपुरीचं नाव ’मयन नगर’ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मैनपुरी हे ठिकाणी मयन ॠषींची तपोभूमी असल्यानं ’मयन नगर’ असं नामकरण करण्याचा प्रस्ताव आहे. पण संबंधित बैठकीदरम्यान मैनपुरीचं नाव बदलण्याबाबत काही जिल्हा पंचायत सदस्यांकडून विरोध करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा पंचायत सदस्यांचं बहुमत मिळाल्यानंतर जिल्हा पंचायत अध्यक्षा अर्चना भदौरिया यांनी मैनपुरीचं नामकरण ’मयन नगर’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!