मनसे नेते गजानन काळेंना अटक करण्यासाठी गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश, महाविकास आघाडीतील महिला कार्यकर्त्या आक्रमक
नवी मुंबई,
नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळेंवर पत्नी संजीवनी काळे यांनी शारिरीक, मानसिक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल होऊन सहा दिवस उलटून गेले तरी नवी मुंबई पोलिसांनी अद्याप गजानन काळेंना अटक केली नाही. आता खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गजानन काळेंना अटक करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत.
महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग-ेस, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पोलीस आयुक्तांलयाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न महिलांनी केला. यावेळी त्यांना अडवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. अखेर गृहमंत्र्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला भेटून परिस्थिती समजून घेतली. त्यावेळी गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांना होत असलेल्या अन्यायाचा पाढा त्यांनी वाचला. यावेळी पोलीस आयुक्त बिपीन कुमार यांनी गजानन काळेंना पकडण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आल्या असून लवकरच अटक होईल असे स्पष्ट केले.
गजानन काळे यांना अटक केली जात नसल्याने भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नवी मुंबई पोलीसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करत संजीवनी काळे यांना न्याय देण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली होती.
गजानन काळे यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा फायदा उचलून मोठ्या प्रमाणात काळी माया गोळा केली आहे. शिक्षण प्रवेश आणि मनपा अधिकार्यांना धाक दाखवून करोडो रुपये गजानन काळे यांनी गोळा केले. याबाबत तपास होणार असेल तर आपण यंत्रणेला सगळी माहिती देण्यास तयार आहोत असे पत्नी संजिवनी काळे यांनी सांगितलं होतं. घरात जास्त दिवस रोकड न ठेवता अन्य व्यक्तीच्या नावावर सर्व रोकड बँकेत जमा करायचा. ही रोकड घेऊन येणार्या चार कार्यकर्त्यांची नावेही त्यांनी सांगितली आहेत. लाखो रुपये गोळा करून हे कार्यकर्ते घरी यायचे. एबी नावाच्या बोगस कंपनीच्या नावाने सर्व आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. सदनिका, चार चाकी वाहने, मोबाईल अशा सर्व गोष्टींचे व्यवहार याच कंपनीच्या नावावर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट संजीवनी यांनी केल्याने गजानन काळे यांच्या अडचणीत भर पडली आहे.