संगमनेरमध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन; 47 जणांवर गुन्हे दाखल
संगमनेर (अहमदनगर),
सरकारने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातलेली आहे. ती उठविण्याची मागणी करत आंदोलने केली जात आहेत. मात्र, दुसरीकडे संगमनेर तालुक्यात रविवारी बैलगाडी शर्यत भरविण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 47 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
संगमनेर तालुक्यातील दरेवाडी या गावात रविवारी बैलगाड्यांची शर्यत सुरू असल्याची माहिती घारगाव पोलिसांनी मिळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी सुरु असलेली शर्यत थांबवली आणि घटनास्थळावरून एक बोलेरो पिकअप, दोन बैलांची जोड, शर्यतीचा छकडा अशा मुद्देमालासह सहा जणांना ताब्यात घेतले. तसेच, या प्रकरणी 47 जणांवर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तर, इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत यांनी दिली आहे.
साकुर पठार भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकारी राजेंद्र भोसले यांनी बैठकही घेतली होती. त्यानंतर येथील सुमारे 20 गावे स्थानिक पदाधिकार्यांनी बंद केली होती. मात्र, रविवारी स्वातंत्र्य दिनी प्रशासनाला कोणतीही चाहूल लागू न देता दरेवाडी या गावात उघडपणे बैलगाडी शर्यत घेण्यात आली. यावेळी लोकांनी शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांना या बाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणी 47 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.