वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना धमकी देणारा आहे तरी कोण? मुनगंटीवारांचा सवाल
वर्धा,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आलेल्या प्रकारमुळे खळबळ उडाली आहे. ’नार्वेकरांना धमकी देणार्याचं चरित्र मलाही जाणून घ्यायचंय. थेट वाघाच्या गुहेत जाऊन धमकी दिली, हा कोण आहे बाबा? असा सवाल भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
वर्ध्यात पत्रकारांशी बोलत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्याचा प्रकारावर आश्चर्य व्यक्त केलं.
’गुंडांची इतकी हिम्मत की ते वाघाच्या गुहेत जाऊन नार्वेकरांना व्हॉटसअप करत आहेत. त्यामुळं वाटत की, कायदा व सुव्यवस्थेची भीतीच राहिली नाही. नार्वेकर यांना धमकी देणं हे तर मलाही आश्चर्य वाटतं. नार्वेकरांना धमकी देणार्याच चरित्र मलाही जाणून घ्यायचंय. थेट वाघाच्या गुहेत जाऊन धमकी दिली, हा कोण आहे बाबा?’ असं मुनगंटीवार म्हणाले.
तसंच, ’राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून बदली करण्यास सांगितलं, याचा अर्थ काय? असं सांगणार्याला बेड्या ठोकल्या पाहिजे. कोणाचा ओरिजनल आवाज असला तरी बदली करायची नाही, असा जीआर सरकारने काढला पाहिजे. नार्वेकर स्वत:ला वाघ म्हणतात. त्यांना धमकी त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा विचार करावा लागणार आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.
’20 वर्षपूर्वी राजकारणाचं गुन्हेगारीकरण हा विषय चर्चेला आला होता. पण आता गुन्हेगारांचं राजकारण हा नवीन चर्चेचा विषय आहे. यासंदर्भात कायदे करण्याची गरज आहे. खंडणी मागण्याची, आमच्या माणसाला काम द्या, युट्युबवर अनेक ऑॅडीओ क्लिप आहेत. पोलीस विभागाने सुमोटो कारवाई केली पाहिजे. राज्यात खंडणी मागणारे सुरक्षित आहेत. पण त्रास होणारे मात्र असुरक्षितेची भावना आहे. अशी भावना असेल तर सर्वांनी याचा एकत्र येऊन विचार केला पाहिजे. कोण्या राजकीय पक्षावर आरोप करणार नाही पण खंडणी मागणारे या पक्ष्याचे त्या नेत्यांचे मागे जाऊन त्यांचे नारे लावत स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना फोडून काढण्यासाठी कायदा केला पाहिजे. मकोका लावून आत टाकवे, असं म्हणत मुनगंटीवार यांनी सेनेवर निशाणा साधला.
तसंच, संजय राठोड यांच्याविरोधात तक्रार खरी खोटी आहे याची चौकशी व्हावी, वेगाने चौकशी व्हावी. काय खरं काय खोटं ते पुढं आलं पाहिजे. काय खरं काय खोटं याबाबत श्वेतपत्रिका काढली पाहिजे. लोकांच्या मनात शंका ठेऊ नये. एसआयटी चौकशी होईल याबाबत पूर्वीच मत व्यक्त करणे योग्य नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले.