रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या आढाव्यामुळे प्रतापगड परिसरातील ग्रामस्थांशी संपर्क पुर्ववत

पोलादपूर प्रतिनिधी

2 ऑगस्ट

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण घाटरस्ता ठिक ठिकाणी दरडी कोसळून प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडा कुंभरोशी पयर्ंतचा मार्ग ठप्प झाला. पुढे महाबळेश्वर पयर्ंतचा घाटरस्ता देखील उद्ध्वस्त झाल्याने तब्बल आठवडाभर या गावाचा आणि परिसरातील लोकवस्त्यांचा संपर्क तुटला. सातारा जिल्हा प्रशासनाला या गावापयर्ंत पोहोचता येणे केवळ अशक्य असल्याचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांना निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ पोलादपूर येथील तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना हा रस्ता मोकळा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यासंदर्भात आदेशवजा सुचना दिल्या.

पोलादपूर तालुक्यातील विविध दरडग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त तसेच पुरग्रस्त गावांना सलग सहा दिवस भेटी देत असताना नियमितपणे ना. अदिती तटकरे यांनी या आंबेनळी घाटातील दरडी हटविण्याच्या कामाचा आढावाही घेतला.

शनिवार, दि. 31 जुलै रोजी अखेरीस पोलादपूर ते प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडा कुंभरोशी गावापयर्ंतचा आंबेनळी घाटरस्ता मोकळा झाला.

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह प्रतापगडाच्या पायथ्याशी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभरोशी येथे संपर्क तुटलेल्या गावकर्‍यांना भेटून त्यांना 1 हजार 200 अन्नधान्य किट दिले. तसेच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथून आणखी 10 हजार तयार जेवणाचे पॅकेट्स प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावातील गावकर्‍यांसाठी पाठविले.

प्रतापगडाच्या पायथ्याशी 35 गावे असून सुमारे 2 हजार कुटुंब आहेत. अतिवृष्टीमुळे प्रतापगड पायथा ते महाबळेश्वर रस्ता मागील 7-8 दिवसापासून बंद असल्यामुळे या गावकर्‍यांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. मात्र रायगड जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तेथे जाऊन रस्ता मोकळा करण्याचे काम केले आणि संपर्क तुटलेल्या गावांशी पुन्हा संपर्क साधण्यात यश मिळविले.

या ग्रामस्थांना भेटण्यासाठी राज्याच्या पर्यटन, उद्योग,विधी व न्याय राज्यमंत्री व रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांनी खास तातडीने दौरा केला. प्रतापगडाच्या पायथ्याशी वाडा कुंभरोशी येथील कमानीपयर्ंतचा ठिकाणी दरडी हटविण्यात आलेल्या रस्त्याचे भरपावसात पायी चालत अवलोकन केले.

यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी कमानी पयर्ंत युवा राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांना उत्साह आणि उमेदीने पायी चालत पाहणी करताना पाहून ग्रामस्थांना विशेष अप्रुप वाटले. अदिती ताईंसोबत फोटो काढून आठवडाभराचा संपर्क तुटल्याने आलेला कंटाळा क्षणार्धात दुर होत ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला होता. सर्वत्र ना. अदितीताई तटकरे यांचे आपुलकी व जिव्हाळ्याने कौतुक होताना दिसत होते.

रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्यामुळे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांतील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!