महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण मोठे आव्हान – राजेश टोपे
नाशिक,
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण हे मोठे आव्हान आहे. सध्या लसीकरण हे महत्त्वाचे झाले असून विद्यार्थ्यांच्या लसीकरणावर भर असणार आहे. शिवाय राज्यात आत्तापर्यंत 9 कोटींवर लसीकरण झाले आहे. सोबतच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आम्ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची वाट पाहत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. ते नाशकात बोलत होते.
राज्यात आत्तापर्यंत 70 टक्के पहिला तर 35 टक्के दुसरा डोस झाले आहे. देशातील लसीकरण नियोजनात महाराष्ट्राचा मोठा हातभार आहे. मिशन कवचकुंडलला दिवाळीपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे मंत्री टोपे म्हणाले. शिवाय लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे यावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही यावेळी राजेश टोपे यांनी केले आहे. राज्यात तिसर्या लाटेसारखी परिस्थिती कोठेही नसल्याची माहितीही यावेळी टोपे यांनी दिली.