इपिलेप्सी आजाराबाबत अधिक जनजागृती होणे गरजेचे – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक दिनांक 09 ऑक्टोबर 2021:
इपिलेप्सी आजारात रुग्णासोबत त्याच्या कुटुंबियानाही अधिक मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते, या रुग्णांना तपासणी व उपचारासाठी अधिक वेळ लागतो, त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती होणे गरचेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशनच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम शेख, डॉ.निर्मल सूर्या, आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, डॉ. सुरूपा ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.एम.बी.देशमुख, डॉ.संजय सदावर्ते यांच्यासह अधिकारी व इपिलेप्सी फाऊंडेशन पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य मिशन च्या माध्यमातून डॉ. निर्मल सुर्या यांच्या इपिलेप्सी फौंडेशनच्या वतीने रुग्णांना विविध ठिकाणी सुविधा पुरविण्यात येतात. जगभरात या संस्थेने इपिलेप्सीबाबत मार्गदर्शन करतेय. क्रिटीकल केसेस सोडविण्यात त्यांची तपश्चर्या मोठी आहे. त्यांनी कॅम्पच्या माध्यमातून ३२ हजार रुग्णांची तपासणी त्यांनी केली आहे. इपिलेप्सी उपचाराबाबत डॉ. निर्मल सूर्या यांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. इपिलेप्सी रुग्णांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. नागरिकांनी अंधश्रद्धा बाळगू नये त्यासाठी योग्य उपचार घ्यावेत. अंधश्रद्धा बाळगणाऱ्या नागरिकांमध्ये जाऊन रुग्ण शोधून त्यांची तपासणी करण्याची गरज आहे. यासाठी शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी योगदान द्यावे. योग्य उपचारातून इपिलेप्सी रुग्ण नक्कीच बरा होतो, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
पुढे बोलताना श्री. भुजबळ म्हणाले. इपिलेप्सी हा आजार समूळ नष्ट करू शकतो त्यासाठी या रोगाविरुद्ध लढले पाहिजे त्यासाठी योग्य वैद्यकीय उपचार घेण्याची आवश्यकता आहे. इपिलेप्सी फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सेवाभावी माध्यमातून केली जाणारी आरोग्य सेवा अतिशय कौतुकास्पद आहे. इपिलेप्सी रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी डॉक्टरांपर्यंत पोहचवावे. हा आजार बरा होणारा आहे. डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार घेण्याची व त्याबाबत असलेल्या अंधश्रद्धा दुर करण्याची सर्वांची जबाबदारी सर्वांची असल्याचेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी डॉ.निर्मल सूर्या म्हणाले की, सन २००० साली इपिलेप्सी फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून आज २१ वर्ष आज पूर्ण झाले आहेत. आजपर्यंत ९६ कॅम्प झाले असून कोरोनाच्या काळात अशा प्रकारचा कॅम्प घेणे अतिशय कठीण होते. कोरोनाच्या काळात रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने या काळातही आपण ४ कॅम्प आयोजिले आहेत. मिरगी आजारापासून जास्तीत जास्त रुग्ण बरे कसे होतील तसेच त्यापासून दूर कसे राहतील त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. रुग्णांना असलेल्या अडचणी इपिलेप्सी फाउंडेशनच्या वतीने दूर केल्या जातील. मुंबईतही रुग्णसेवा मोफत पुरवली जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उपसंचालक पी.डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.