गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी नियोजन करावे : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
पीक कर्ज वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी व उपाययोजना सुचविणेबाबत आढावा बैठक संपन्न
नाशिक : दि.14 आपला जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने कुठलाही गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याकरिता शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करवे, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पीक कर्ज वाटपाबाबत येणाऱ्या अडचणी व उपाययोजना सुचविणे बाबत घेण्यात आलेल्या बैठकीत उपाध्यक्ष श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अर्धेंद्रु शेखर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक मोहमद आरीफ यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे समन्वयक उपस्थित होते.
विधनसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, नवीन शासन निर्णयानुसार लक्षांकानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटप करावे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, तसेच या भागात काम करतांना सर्व बँकांनी संवेदनशिलता बाळगावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हातभार लावावा. तसेच या योजनेंतर्गत येणारा निधी बँकांनी वसुलीपोटी जमा करू नये, अशा सूचनाही उपाध्यक्ष श्री.झिरवाळ यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व संबंधित बँकांना केल्या आहेत.
सन 2020-2021 हंगामाकरीता पीक कर्ज वाटप करण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकांनी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लक्षांकानुसार जास्तीत जास्त पिक कर्ज पुरवठा शेतकऱ्यांना करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे. या सर्व बँकांनी कर्ज पुरवठा करतांना आणि कर्जाची वसूली करतांना नियोजन करून आराखडा तयार करावा व त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी. कर्जफेड करण्याबाबत असणाऱ्या नियमांची स्थानिक भाषेत जनजागृती केल्यास त्याचा अधिक सकारात्मक परिणाम दिसून येईल असेही उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सांगितले आहे.
कर्ज परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करावा : जिल्हाधिकारी सूरज मांढरे
कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी बँकांनी माहितीचे फलक लावून व मेळावे घेवून माहिती द्यावी, जेणेकरून कर्जाची परतफेड करतेवेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल आणि ते वेळेत कर्जाची परतफेड करू शकतील. तसेच शेतकऱ्यांनी 30 जून पर्यंतकर्ज परतफेड करण्याचे आव्हानही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज झालेल्या बैठकीत केले आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, वितरण प्रक्रियेतील सर्व अडचणी दूर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न जिल्हा अग्रणी बँक तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून करण्यात येत आहे. पीक कर्ज वाटप करतांना बँकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीच्या माधमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकर मिळावे. तसेच बँकांना येणाऱ्या अडचणींचेही तात्काळ निरसन केले जात आहे. प्रत्येक पंधरा दिवसांनी सर्व बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर कर्ज वाटपाचे काम वाढविण्या बाबतच्या सूचना देऊन त्यांचा पाठपुरावा ही करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागात वसूली करतांना तुर्तास कोणत्याही प्रकारचा लीलाव बॅंकांनी करू नये अशा सुचनाही यावेळी उपस्थित सर्व बँकांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जाची थोडीफार थकबाकी रक्कम जमा केली तर ते शेतकरी नवीन कर्ज मिळविण्यास पात्र ठरतील. जे शेतकरी 30 जून पर्यंत नियमीत कर्जाची परतफेड करतील त्यांना शुन्यटक्के व्याजदराने नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी बँकेशी तातडीने संपर्क करून थकबाकी जमा करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी केले.