खानगाव (नजिक) मिरची मार्केटला कायमस्वरूपी दर्जा मिळावा —बाबुराव सानप.

निफाड / रामभाऊ आवारे,

द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था मार्च 2015 मध्ये झालेल्या गारपिटीपासुन
अतिशय अवघड बनत चालली असून परकीय व नगदी चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष पिकाच्या खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग भाजीपाला पिकांकडे वळू लागला असतानाच सद्यस्थितीत भाजीपाल्याला अत्यल्प भाव असल्याने शेतकऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला जवळची बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यांना शेतीत हाडाची काडे कडून गाळलेल्या घामाचे हक्काचे चार पैसे हातात मिळावे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत खानगाव- खडक माळेगांव येथे प्रायोगिक तत्वावर मिरची, भाजीपाला मार्केट सुरू असून खडक माळेगाव-वनसगाव सह परीसरातील गावातील शेतकऱ्यांबरोबरच इतर तालुक्यातूनही मुबलक प्रमाणात मिरची, भाजीपाला व सद्यस्थितीत द्राक्षमणी विक्रीस येत आहे.स्थानिक शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांची खूप दिवसांची मागणीची पूर्तता झाली असली तरी या उपबाजारातील आवक लक्षात घेऊन सद्य स्थितीत सुरू असलेले तात्पुरते मार्केटला कायमस्वरूपी दर्जा मिळावा अशी मागणी रासाका बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष तथा वंजारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबुराव किसन सानप सोनेवाडी यांनी केली आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या लासलगाव- पिंपळगाव रस्त्यावरील खानगाव नजीक/खडक माळेगाव उपबाजारात भाजीपाला व मिरची मार्केट सुरु करावे अशी मागणी ४/५ वर्षांपासून खडक माळेगाव, वनसगाव ,सारोळे खुर्द, उगाव, कोटमगाव,खानगाव, खेडे,थेटाळे, शिवडी,सोनेवाडी, रानवड, सावरगाव, नांदुर्डी, दरसवाडी या गावातील असंख्य शेतकऱ्यांनी खानगाव उपबाजारात भाजीपाला विक्री व्यवस्था सुरू करावी अशी मागणी केली होती.अखेरीस १ सप्टेंबर २०२० रोजी प्रायोगिक तत्त्वावर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप ,सचिव नरेंद्र वाढवणे, प्रभारी वैभव वाकचौरे तसेच निवडक शेतकरी व व्यापारी यांच्या उपस्थितीत मिरची मार्केट सुरू करण्यात आले. या मिरची मार्केटला प्रचंड प्रतिसाद मिळत असून अल्पावधीतच
या मिरची मार्केट वर वर्षभरात १८ कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या उपबाजारात मिरची व भाजीपाला मार्केट सुरू केल्याने परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करून आपल्या उत्पन्नात वाढ केल्याने या मार्केट मुळे शेतकरी समाधानी आहे.
एकंदरीत मिरची व भाजीपाला यांची आजमितीस १० ते १५ हजार बॅग दररोज आवक आहे. या ठिकाणी खरेदी – विक्री व्यवस्था पारदर्शक असल्याने या ठिकाणी नांदगाव, येवला, कोपरगाव, सिन्नर ,निफाड, दिंडोरी, चांदवड, देवळा, कळवण,अभोणा,लोहणेर आदी तालुक्यातून मिरची, टोमॅटो ,कोबी ,भेंडी ,कारले व भाजीपाला लिलावासाठी येत असल्याने लवकरच नाशिक जिल्ह्यातील खानगाव मिरची मार्केट हे मिरची हब म्हणून ओळखले जाईल अशीच एकंदरीत शेतकरी वर्गात चर्चा आहे.

@@ खानगाव मिरची मार्केटमध्ये 40 ते 50 गावातील मिरची व भाजीपाला विक्रीला—
या उपबाजारावर तालुक्यातील किमान ४०/५० गावांतील शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे‌. एकंदरीत भाजीपाल्याची आवक बघता व नाशिक जिल्ह्यात हिरवी मिरचीचे मार्केट म्हणून खानगाव येथे सुरू केलेल्या तात्पुरत्या मिरची मार्केटला जिल्ह्यासह अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली असून या ठिकाणी कुठलीही सोय सुविधा नसतानाही एवढ्या चांगल्या पद्धतीने हे मार्केट सुरू असल्याने वाढती आवक लक्षात घेता मिरची मार्केट कायमस्वरूपी होणे गरजेचे.
प्रल्हाद डुंबरे (खरेदीदार) वनसगाव

@@ खानगाव उपबाजारामुळे शेतकऱ्यांची वेळेची व पैशाची बचत–
खानगाव नजिकला हिरवी मिरची व भाजीपाला सुरू केल्याने द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परकीय व नगदी चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष पिकाच्या उत्पादित मालाच्या खर्चापेक्षा मिळणाऱ्या अत्यल्प भावाने बेजार झाला असून बहुतांश द्राक्ष उत्पादक शेतकरी भाजीपाला मिरची या पिकांकडे वळला आहे.याठिकाणी इतरही तालुक्यातून अनेक शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणत असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी भाजीपाला लिलाव सुरू केल्याने वेळेची व पैशाची बचत होत आहे.
विकास रायते- संस्थापक जाणता राजा मित्र मंडळ (खडक माळेगाव).

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!