कोरोनासह इतर काळातही चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्यास शासन सज्ज : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक,

जिल्ह्यातील नागरिक, गरोदर महिला व गरजू रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणावर भर देण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानेच कोरोना सोबतच इतर काळातही चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी शासन सज्ज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज जिल्हा सामन्य रुग्णालय येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते एकूण 10 रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनासारख्या कठीण काळात नातेवाईक रुग्णाला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हते मात्र रुग्णवाहिका चालक त्यांना दवाखान्यात घेऊन येणे आणि परत आणण्याचे महत्वपूर्ण काम करत होते. यामध्ये डॉक्टर परीचारीका व आरोग्य सेवेतील इतर कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा, व अन्न धान्य पुरवठा विभाग यांनी देखील आपली महत्वाची भूमिका पार पाडली असून ईश्वर सेवा समजून जनसेवा केली ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. याच पार्श्वभूमीवर 10 रुग्णवाहिका आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपलब्ध झाल्या आहेत. याचा अधिक फायदा ग-ामीण भागातील गरजू रुग्णांना होणार असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

कोरोनाचे संकट अद्यापही संपलेल नाही. त्या अनुषंगाने पुरेपूर नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यात कारोनाच्या पार्श्वभुमीवर या आजाराचे वेळेत निदान होण्यासाठी 20 हजार रूग्णांचे टेस्टींग करू शकेल एवढी यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात 32 संस्थाकडे 41 तर जिल्हा परिषदे अंतर्गत 112 अशा एकुण 155 रूग्णवाहिका सद्या नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असून, कोरोना काळात या रूग्णवाहिकांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असून ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी जबाबदारीने वागून शासनाला व आरोग्य सेवेला सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!